Mohammed Yunus : बांगलादेशातील अल्पसंख्यांकांवरील हिंसाचाराच्या विरोधात आता बांगलादेशातील हिंदू समुदाय आणि इतर अल्पसंख्याक एकत्र आले आहेत. शनिवारी, अल्पसंख्याक समाजातील लाखो लोक रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त करण्यासाठी आणि त्यांची एकता दर्शविण्यात जमा झाले. बांगलादेशची राजधानी ढाका आणि देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर चितगाव येथे मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले आणि अल्पसंख्याकांवरील हिंसाचाराचा निषेध केला.
मोहम्मद युनूस यांनी केले भावनिक आवाहन
बांगलादेशचे अंतरिम सरकारचे नेते मोहम्मद युनूस यांनीही अल्पसंख्याकांवरील हिंसाचारावर नाराजी व्यक्त केली आणि त्याला घृणास्पद म्हटले. मोहम्मद युनूस यांनी आंदोलक विद्यार्थ्यांना अल्पसंख्याक हिंदू, ख्रिश्चन आणि बौद्धांना वाचवण्याचे आवाहन करत म्हणाले, ‘हे आपल्या देशातील लोक नाहीत का? जर तुम्ही देश वाचवला तर काही कुटुंबांना वाचवू शकत नाही का?… कोणाचेही नुकसान होणार नाही असे तुम्ही म्हणावे. तोही आमचा भाऊ आहे. आम्ही एकत्र लढलो आणि एकत्र राहू. असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.
शेख हसीना यांचे सरकार पडल्यापासून अल्पसंख्याक लक्ष्यावर
बांगलादेशमध्ये शेख हसीना यांचे सरकार पडल्यानंतर देशातील 52 जिल्ह्यांमध्ये अल्पसंख्याकांविरोधात 205 हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. या हिंसाचाराच्या घटनांमध्ये शेकडो अल्पसंख्याक जखमी झाले असून अनेक घरे उद्ध्वस्त झाली आहेत. अनेक हिंदू मंदिरांनाही लक्ष्य करण्यात आले आहे. शेख हसीना यांचा पक्ष अवामी लीगच्या दोन हिंदू नेत्यांचाही हिंसाचाराच्या घटनांमध्ये मृत्यू झाला आहे. हिंदू समाजाचे हजारो लोक देश सोडून जाण्याचा विचार करत आहेत.
शनिवारी मोठ्या संख्येने अल्पसंख्याक समाजाचे लोक ढाक्यातील रस्त्यावर उतरले. अल्पसंख्याकांवर हिंसाचार करणाऱ्यांवर त्वरित आणि कठोर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. तसेच संसदेतील १० टक्के जागा अल्पसंख्याकांसाठी राखीव ठेवाव्यात. अल्पसंख्याक संरक्षण कायदा करावा. आंदोलकांनी अनेक तास रास्ता रोको केला. यावेळी अनेक मुस्लिम आणि विद्यार्थ्यांनीही अल्पसंख्याकांना पाठिंबा दिला.