Maharashtra Weather Today : थोड्याशा विश्रांतीनंतर पावसाला पुन्हा सुरुवात होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. हवामान खात्याने महाराष्ट्रातील 6 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे. यासोबतच वादळ आणि वीज पडण्याचा देखील इशारा दिला आहे.
मुंबईतील बहुतांश भागात ढगाळ वातावरण तसेच हलका पाऊस पडण्याचे संकेत आहेत. या कालावधीत तापमान 26 अंश सेल्सिअस ते 30 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. वाऱ्याचा वेग ताशी 15 किलोमीटर इतका राहणार आहे.
हवामान खात्याने अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा आणि वाशीमसह महाराष्ट्रातील अनेक भागात यलो अलर्ट जारी केला आहे. आता पुण्यासह राज्याच्या काही भागात पावसाचा जोर कमी होताना दिसत आहे.
‘या’ जिल्ह्यांत मुसळधार पाऊस झाला
हिंगोली वगळता इतर सर्व जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. काही जिल्ह्यांत मुसळधार पाऊसही पडला आहे. त्यात पुणे, सातारा आणि कोल्हापूरचा समावेश आहे. आयएमडीच्या आकडेवारीनुसार सांगलीत ६३ टक्के तर पुणे जिल्ह्यात ६२ टक्के अधिक पाऊस झाला आहे. या पावसाळ्यातील पर्जन्यमानाच्या अभ्यासानुसार महाराष्ट्रातील 36 पैकी 25 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याचे समोर आले आहे.
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार 15 ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रासह मध्य भारताच्या भागात कमी पाऊस पडण्याचे संकेत आहेत. 16 ऑगस्टनंतर, 23-24 ऑगस्टच्या आसपास मध्य भारतातील भागात पुन्हा एकदा मान्सूनच्या हालचाली तीव्र होण्याची अपेक्षा आहे.