Muhammad Yunus : बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे सल्लागार मोहम्मद युनूस यांनी मंगळवारी ढाकेश्वरी मंदिराला भेट दिली. बांगलादेशात हिंदूंवर सुरु असलेल्या अत्याचाराच्या पार्श्ववभूमीवर मोहम्मद युनूस यांची ही भेट महत्वाची मानली जात आहे.
बांगलादेशात गेल्या काही दिवसांपासून हिंदूंवर हल्ले वाढले असताना मोहम्मद युनूस यांनी हिंदू मंदिराला भेट दिली आहे. मंदिरात जाऊन त्यांनी काही हिंदूंशी चर्चा करत सरकार तुमच्यासोबत असल्याचे आश्वासन दिले. तसेच त्यांच्या सद्यस्थितीची चौकशीही केली.
यावेळी ते म्हणाले, देशाला संकटातून बाहेर काढायचे असेल लोकांमध्ये फूट पाडण्याऐवजी एकत्र आले पाहिजे. अशा आव्हानात्मक काळात प्रत्येकाने संयम राखला पाहिजे. आम्हाला असा बांगलादेश निर्माण करायचा आहे जो एका कुटुंबासारखा असेल आणि कुटुंबात भेदभाव आणि भांडणाचा प्रश्नच उद्भवत नाही. आपण सर्व बांगलादेशचे लोक आहोत. आपण सर्वजण येथे शांततेत राहू शकतो याची खात्री करून घ्यायची आहे.
पुढे त्यांनी कायदा सर्वांना समान असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. आपल्या समाजात असा भेदभाव करण्याची गरज नाही. आपल्याला ते दुरुस्त करावे लागेल. हा रोग मुळापासून नष्ट करणे आवश्यक आहे. तसेच यावेळी त्यांनी धर्म किंवा जातीच्या आधारावर भेदभाव करू नका असे आवाहन करत देशातील सर्व जनतेसाठी एकच कायदा आणि एकच संविधान असायला हवे असे सांगितले.
बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार
बांगलादेश हिंदू बौद्ध ख्रिश्चन एकता परिषद आणि बांगलादेश पूजा उद्योग परिषद, दोन हिंदू संघटनांच्या मते, बांगलादेशातील अल्पसंख्याक समुदायाच्या सदस्यांवर 5 ऑगस्ट रोजी शेख हसीना यांच्या नेतृत्वाखालील सरकार पडल्यानंतर किमान 53 जिल्ह्यांमध्ये हल्ले झाले आहेत. किमान 205 जणांना या हल्ल्यांचा सामना करावा लागला आहे. अशा परिस्थितीत हजारो बांगलादेशी हिंदू हिंसाचारापासून वाचण्यासाठी भारताच्या शेजारच्या देशात येण्याचा प्रयत्न करत आहेत.
काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हिंदूवरील हल्ल्यांबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यामुळे यूनुस यांनी हिंदू मंदिरात जात भारतालाही एक सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जात आहे.