.उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये ‘फाळणी वेदना स्मरणदिना’निमित्त आयोजित कार्यक्रमात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पाकिस्तानबाबत मोठा दावा केला आहे. ‘एकतर पाकिस्तान विलीन होईल अथवा नष्ट होईल’.असे म्हणत त्यांनी पाकिस्तानला सावध केले आहे. तसेच १९४७ मध्ये जे घडले तेच आता बांगलादेशात घडत आहे.असे ते म्हणाले आहेत. ते पुढे म्हणाले, पाकिस्तानची परिस्थिती अशी आहे की, त्याचे भारतात विलीनीकरण निश्चित आहे. बांगलादेशातील हिंदू आपल्या जिवाची याचना करत आहेत. बांगलादेशातील हिंदूंसाठी कोणी काही बोलत नाही. भारतात काही लोकांच्या तोंडाला टाळे लागले आहे.मात्र भारतातील सरकार या हिंदूंच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे आणि हेच सरकार अखंड भारताचे स्वप्न पूर्ण करेल यात शंकाच नाही.
1947 मध्ये जर भारताच्या राजकीय नेतृत्वाकडे मजबूत इच्छाशक्ती असती, तर जगातील कोणतीही ताकद अशी अनैसर्गिक फाळणी करू शकली नसती. कारण अखंड भारत ही मुळातच अध्यात्मिक चेतना आहे. ती फक्त भौतिक चेतना नाही, परंतु काँग्रेसच्या नेत्यांनी सत्तेच्या मोहाने देशाला बरबाद केले. त्यांच्याकडे सत्ता गेली, आणि त्यांनी त्यावेळी देशाच्या बदल्यात राजकारण केले असे म्हणत योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेसवर हल्ला चढवला आहे. काँग्रेसला जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा-तेव्हा त्यांनी देशाचा गळा घोटण्याचे काम केले आहे. त्यांच्या पापांची कधीच क्षमा होऊ शकत नाही. असेही ते पुढे म्हणाले आहेत.
मागील 10 वर्षातील भारताच्या प्रगतीचा गौरव करताना त्यांनी सांगितले, मागील 10 वर्षात भारताने केलेल्या प्रगतीमुळे जग अचंबित झाले आहे. त्यामुळे जगात कुठेही संकट आले तरी आता मदतीसाठी भारताकडे पाहिलेजाते. त्यामुळे 2047 चा भारत हा अखंड आणि सर्व बाजूंनी बळकट असेल, अशी ग्वाही योगींनी दिली आहे. .
.