आज देशाच्या 78 वा स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन ध्वजारोहण केले आहे. आणि देशाला संबोधित करण्यास सुरवात केली आहे. यावेळी त्यांनी विकसित भारत प्रत्यक्षात आणण्याबाबत आपल्या संकल्पाचा पुनरुच्चार केला आहे.
यावेळी त्यांनी भाषणाच्या सुरवातीला स्वातंत्र्यसाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्र्यवीरांचे स्मरण केले. ते म्हणाले आहेत की, स्वातंत्र्यापूर्वीचा काळ आठवा. शेकडो वर्षांची गुलामगिरी. प्रत्येक काळ संघर्षाचा राहिला. तरुण, महिला, आदिवासी, शेतकरी या सगळ्यांनीच अविरत लढा दिला. इतिहास साक्षी आहे की १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामाच्या आधीही देशाच्या अनेक आदिवासी भागांमधून स्वातंत्र्याचा लढा दिला जात होता. गुलामगिरीचा एवढा मोठा काळ, जुलुमी शासक, अखंड यातना, सामान्यांचा विश्वास तोडण्याचा प्रत्येक मार्ग हे सगळं असूनही तेव्हाच्या लोकसंख्येनुसार स्वातंत्र्यापूर्वी ४० कोटी देशवासीयांनी संघर्षाचा संकल्प केला. भारताच्या स्वातंत्र्याचं स्वप्न त्यांनी पाहिले
आपल्याला गर्व आहे की आपल्या नसांमध्ये त्यांचच रक्त आहे. ते आपले पूर्वज होते. ४० कोटी लोकांनी जगाच्या महासत्तेला उचलून फेकून दिलं होतं. आपल्या नसांमध्ये रक्त असणाऱ्या आपल्या पूर्वजांनी ४० कोटी असूनही गुलामगिरीच्या साखळ्या तोडल्या होत्या. आज आपण 140 कोटी आहोत. जर 40 कोटी भारतीय गुलामीची बेडी तोडू शकतात. 40 कोटी लोक स्वातंत्र्याचे स्वप्न पूर्ण करु शकतात, तर 140 कोटी लोक संकल्प घेऊन निघाले, एक दिशा ठरवून निघाले, तर आव्हान कितीही असोत, प्रत्येक आव्हानाला पार करुन आपण समृद्ध भारत बनवू शकतो 2047 साली विकसित भारताचा स्वप्न साकार करु शकतो” असे पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.