PM Narendra Modi : पॅरिस 2024 ऑलिम्पिक गेम्समध्ये भारतीय खेळाडू आपली प्रतिभा चमकदारपणे दाखवत आहेत. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताने आतापर्यंत एकूण 6 पदके जिंकली, ज्यात 5 कांस्य आणि एक रौप्य पदक समाविष्ट आहे. मनू भाकरने इतिहास रचला आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले पदक मिळवून दिले, त्यानंतर भारतीयांच्या अपेक्षा आणखी वाढल्या. भारताने हॉकीमध्ये कांस्यपदक पटकावले, तर नीरजने रौप्यपदक, अमनने कुस्तीमध्ये कांस्यपदक जिंकले.
दरम्यान, पंतप्रधान मोदींनी या खेळाडूंचे लाल किल्ल्यावर सुरु असलेल्या भाषणात कौतूक करत एक मोठी घोषणा केली आहे. आज 78 वा स्वातंत्र्यदिनानिमित्त मोदी संपूर्ण देशाशी संबोधित करत आहेत, यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले, तसेच ऑलिम्पिक गेम्सबाबतही एक मोठे विधान केले.
आपल्या भाषणात पीएम मोदी म्हणाले की, “आज जे तरुण इथे बसले आहेत त्यांनी ऑलिम्पिकमध्ये भारताचा झेंडा फडकवला आहे. मी भारताच्या वतीने देशातील खेळाडूंचे अभिनंदन करतो. येत्या काही दिवसांत भारतीय संघ पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेसाठी जाणार आहे. मी त्यांना शुभेच्छा देतो.” आजच्या कार्यक्रमाला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंना खास निमंत्रण देण्यात आले.
ते पुढे म्हणाले की, “G20 चे आयोजन भारतात करण्यात आले होते. अनेक शहरांमध्ये 200 हून अधिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावरून हे दिसून आले आहे की भारतामध्ये सर्वात मोठ्या स्पर्धांचे आयोजन करण्याची ताकद आहे, म्हणूनच आमचे स्वप्न आहे की 2036 मध्ये होणारे ऑलिम्पिक येथे आयोजित केले जावे. यासाठी आम्ही तयारी करत आहोत.”