PM Narendra Modi : बांगलादेशात सत्तापालट झाल्यापासून हिंदूंवर प्राणघातक हल्ले होत आहेत. यावरच अनेक दिवसांपासून चिंता व्यक्ती केली जात आहेत, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशाचे अंतरिम सरकार मोहम्मद युनूस यांना हिंदूंची सुरक्षितता निश्चित करा असे आवाहन केले होते, त्यानंतर आज 78 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करतात बांगलादेशमधील परिस्थितीचा उल्लेख करत त्यावर भाष्य केले आहे.
आपल्या भाषणात पीएम मोदींनी बांगलादेशातील हिंसाचाराचाही उल्लेख केला. ते म्हणाले की, “बांगलादेशमध्ये जे काही घडले त्याबद्दल एक शेजारी देश म्हणून चिंता करणे स्वाभाविक आहे. मला आशा आहे की तिथली परिस्थिती लवकरच सामान्य होईल. तेथील अल्पसंख्याक हिंदू समाजाची सुरक्षा सुनिश्चित व्हावी, अशी देशवासीयांची इच्छा आहे. आपल्या शेजारी देशांनी सुख आणि शांतीचा मार्ग अवलंबावा अशी भारताची नेहमीच इच्छा असते. येणाऱ्या काळात बांगलादेशच्या विकास प्रवासाठी आमच्या शुभेच्छा कायम राहतील, कारण आम्ही मानवजातीच्या कल्याणाचा विचार करणारे लोक आहोत.”
शेख हसीना यांचे सरकार पडल्यापासून अल्पसंख्याक लक्ष्यावर
बांगलादेशमध्ये शेख हसीना यांचे सरकार पडल्यानंतर देशातील 52 जिल्ह्यांमध्ये अल्पसंख्याकांविरोधात 205 हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. या हिंसाचाराच्या घटनांमध्ये शेकडो अल्पसंख्याक जखमी झाले असून अनेक घरे उद्ध्वस्त झाली आहेत. अनेक हिंदू मंदिरांनाही लक्ष्य करण्यात आले आहे. शेख हसीना यांचा पक्ष अवामी लीगच्या दोन हिंदू नेत्यांचाही हिंसाचाराच्या घटनांमध्ये मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीत हिंदू समाजाचे हजारो लोक बांगलादेश सोडून जाण्याचा विचार करत आहेत.