मुंबई : भाजपचे खासदार नारायण राणे यांच्या खासदारकीला आव्हान दिल्यानंतर, आता मुंबई हायकोर्टाने समन्स बजावली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्या निवडीला आव्हान देत, मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
नारायण राणे यांनी रत्नागिरी सिधुदुर्ग लोकसभा निवडणूक भ्रष्ट मार्गाने जिंकल्याचा दावा यचकियेत करण्यात आला आहे. याप्रकरणी मुंबई हायकोर्टाने शुक्रवारी राणेंना नोटीस बजावली आहे. या सुनावणीनंतर कोर्टाने राणेंसह निवडणूक अधिकाऱ्यांना नोटीस बजावून म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. आता पुढील सुनावणी 12 सप्टेंबरला होणार आहे.
नेमकं काय आहे प्रकरण ?
नुकत्याच झालेल्या लोकसभा 2024 च्या निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे यांनी राऊतांचा पराभव केला आहे. नारायण राणे हे भाजपच्या तिकीटावर तर विनायक राऊत हे शिवसेना ठाकरेंच्या मशाल चिन्हावर निवडणूक लढले. यावेळी नारायण राणे यांनी विनायक राऊत यांचा 47858 मतांनी पराभव केला. मात्र नारायण राणे यांनी मतदारांना धमकी देऊन, बळजबरी करुन मतदान करुन घेतल्याचा आरोप विनायक राऊत यांनी केला. केवळ आरोप न करता विनायक राऊत यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली.
तसेच नारायण राणे यांचा विजय रद्द करुन निवडणूक काळातील भ्रष्टाचाराच्या सखोल चौकशीसाठी स्वतंत्र समिती नेमण्याचे आदेश द्या, अशी मागणी विनायक राऊत यांनी केली. आता कोर्टाच्या या नोटीशीला राणे काय उत्तर देणार, हे पाहावे लागेल.