Modi Government : पश्चिम बंगालमधील एमजी कर वैद्यकीय महाविद्यायातील ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार करून खून केल्याच्या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला आहे. या घटनेला दोन दिवस उलटून गेल्यानंतर केंद्र सरकारला जाग आली असून, डॉक्टरांची सुरक्षा निश्चित करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे.
एमजी कर वैद्यकीय महाविद्यायात घडलेल्या त्या घटनेनंतर देशभरातील डॉक्टर संताप व्यक्त करत संपावर आहेत. देशभरात डॉक्टर आणि परिचारिका संपावर गेल्याने आरोग्य सेवा कोलमडली आहे. केंद्र सरकारने सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची हमी द्यावी, अशी डॉक्टरांची मागणी आहे. या दिशेने एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलत केंद्र सरकारने शुक्रवारी आदेश जारी केला, एखाद्या डॉक्टरवर कोणत्याही प्रकारचा हिंसाचार झाल्यास त्याला वैद्यकीय महाविद्यालय किंवा रुग्णालयाचे प्रमुख जबाबदार असतील.
नोटीस जारी करत म्हटले आहे की, आरोग्य कर्मचाऱ्यांवर कोणत्याही प्रकारचा हिंसाचार झाल्यास घटनेच्या ६ तासांच्या आत एफआयआर दाखल करण्यात यावा. तसे न झाल्यास वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रमुखावरही कारवाई होऊ शकते.
https://x.com/ANI/status/1824346443873914977
केंद्र सरकारने डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी कायदा करावा, ही डॉक्टरांची सर्वात महत्त्वाची मागणी होती. त्यांच्या म्हणण्यानुसार, डॉक्टरांवर रोज कुठे ना कुठे हल्ले होत आहेत. त्यांच्या जिवाशी खेळ केला जात आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने कायद्याच्या माध्यमातून देशभरातील डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी योग्य तो कायदा करावा, अशी डॉक्टरांची मागणी होती. यासाठी डॉक्टरांनी केंद्र सरकार आणि आरोग्यमंत्र्यांना पत्रही लिहिले होते.
केंद्र सरकारने डॉक्टरांना पाठिंबा देण्याबाबत आणि त्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्याबाबत बोलले होते. मात्र, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कोणताही कायदा आणण्याबाबत कोणतीही चर्चा होत नसून, आज केंद्र सरकारकडून एक आदेश जारी करण्यात आला आहे, याअंतर्गत आरोग्य कर्मचाऱ्यांवर कोणत्याही प्रकारचा हिंसाचार झाल्यास वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रमुखांवर कारवाई करण्यात येईल. तसेच पोलिसांना ताबडतोब माहिती देणे बंधनकारक आहे आणि घटनेची एफआयआर नोंदवणे देखील आवश्यक असेल. असे म्हंटले आहे.