Maharashtra Assembly Election 2024 : आज केंद्रीय निवडणूक आयोगाने हरियाणा आणि जम्मू-काश्मीर या दोन राज्यांतील विधानसभा निवडणुका जाहीर केल्या आहेत. या दोन्ही राज्यांमध्ये १८ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत निवडणुका होणार आहेत. तर या दोन्ही राज्यांचे निकाल ४ ऑक्टोबरला लागणार आहेत.
हरियाणातील सरकारचा कार्यकाळ ३ नोव्हेंबरला संपत आहे, तर जम्मू-काश्मीरमध्ये १० वर्षांनी निवडणुका होत आहेत. तारखा जाहीर करण्यापूर्वी निवडणूक आयोगाने जम्मू-काश्मीरच्या मतदारांचे कौतुक केले. निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, लोकसभा निवडणुकीतील मतदारांमध्ये असलेला उत्साह पाहता आणि चांगले वातावरण लक्षात घेऊन निवडणुका घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पुढे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखांबाबत ते म्हणाले की, महाराष्ट्रात पाऊस हे प्रमुख कारण आहे. शिवाय, सणही जवळ आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत.
महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबरला संपत आहे. निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी निवडणूक आयोगाचे पथक हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये गेले होते, मात्र निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी ते महाराष्ट्रात पोहोचलेच नाही.
झारखंडमध्येही विधानसभा निवडणुका होणार आहेत. तथापि, झारखंड विधानसभेचा कार्यकाळ जानेवारी 2025 मध्ये संपणार आहे.
सध्या महाराष्ट्रात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार आहे. शिवसेनेचे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. भाजपचे देवेंद्र फणवीस आणि राष्ट्रवादीचे अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत. काँग्रेस, शिवसेना (यूबीटी) आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) विरोधी पक्षात आहेत.
महाराष्ट्र आणि झारखंड या दोन्ही राज्यांमध्ये एकाच वेळी निवडणुका होऊ शकतात, असे संकेत निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिले आहेत. निवडणूक आयुक्त म्हणाले की, गेल्या वेळी हरियाणा आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांमध्ये एकाच वेळी निवडणुका झाल्या होत्या. पण त्यावेळी जम्मू-काश्मीर नव्हते. जम्मू-काश्मीरमध्ये बळाची अधिक गरज असल्याने, यावेळी हरियाणा आणि ते एकत्र आले आहेत. त्याचवेळी, पुढील घोषणेमध्ये झारखंड आणि महाराष्ट्राच्या निवडणुकांच्या तारखा एकत्र जाहीर केल्या जाऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.