पश्चिम बंगालमध्ये कोलकत्ता येथे प्रशिक्षणार्थी डॉक्टरावर अत्याचार आणि तिची हत्या करण्यात आल्यानंतर देशभरात सर्व स्तरांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेच्या निषेधार्थ देशभरात डॉक्टरांनीआज 24 तासांच्या बंदची हाक दिली आहे.डॉक्टरांची संघटना IMA ने या संपात सहभागी होण्याचे आवाहन केल्यानंतर दिल्लीपासून ते चेन्नईपर्यंत आरोग्य सेवा विस्कळीत झाली आहे. या कोलकातामधील घटनेमुळे डॉक्टरांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याबाबत सरकारने ठोस पावले टाकावीत, तसेच या हत्याप्रकरणाचा तपास लवकरात लवकर केला जावा तसेच आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात येत आहे.
इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) देशभरातील रुग्णालयांमध्ये 24 तासांच्या संपाची घोषणा केली आहे. या कालावधीत सरकारी आणि खासगी रुग्णालयात रुग्णांची ओपीडी आणि ऑपरेशन्स होणार नाहीत. मात्र,आपत्कालीन सेवा सुरू राहतील.डॉक्टरांशी संबंधित इतर संघटनांनीही आयएमएच्या संपाला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे.
कोलकाता येथील घटना आणि रुग्णालयातील तोडफोडीच्या निषेधार्थ शनिवारी सकाळी ६ ते रविवारी सकाळी ६ वाजेपर्यंत देशभरातील डॉक्टर २४ तास संपावर राहणार असल्याचे आयएमएचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.आर.व्ही.अशोकन यांनी सांगितले आहे . ते म्हणाले की, डॉक्टरांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे. मृत महिला डॉक्टरला न्याय, डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी केंद्रीय कायदा यासारख्या मागण्यांसाठी डॉक्टरांकडून निदर्शने करण्यात येणार आहेत. 3.30 लाखांहून अधिक डॉक्टर आयएमएचे सदस्य आहेत.
कोलकात्याच्या लालबाजार येथील आरजी कार मेडिकल कॉलेज-हॉस्पिटलमध्ये ९ ऑगस्टच्या रात्री एका कनिष्ठ डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. या घटनेविरोधात देशभरात संताप व्यक्त होत आहे. डॉक्टरांच्या सुरक्षेची खात्री करण्याची मागणी करत वैद्यकीय सेवा संघटना या घटनेपासून आंदोलन करत आहेत.
राज्यातील विविध भागांत आज शासकीय रुग्णालयांसोबतच खाजगी डॉक्टरांच्या संघटनांनी देखील आंदोलन पुकारले आहे. यामुळे ओपीडी बंद ठेवण्यात येणार आहे तर शस्त्रक्रिया देखील पुढे ढकलण्यात आल्या आहेत.