महंत रामगिरी महाराज यांनी नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील पंचाळे गावामध्ये प्रवाचनाच्या दरम्यान एका धर्माविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर या वक्तव्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये तणाव निर्माण झाला होता. यादरम्यन राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आंदोलन करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर आणि अहमदनगर शहरात शेकडो आंदोलक रस्त्यावर आले. महंत रामगिरी महाराज यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली होती दरम्यान, महंत रामगिरी महाराज यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी येवल्यात आणि वैजापुरात गुन्हा दाखल झाला आहे.मात्र या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर महंत रामगिरी महाराज यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
रामगिरी महाराज यांना त्यांच्या वक्तव्याबाबत विचारले असता त्यांनी म्हटले की,” हिंदू धर्मीय सहिष्णू आहेत मात्र सहिष्णूतेचा कोणी अंत पाहात असेल तर अशा वेळी आपण मजबूत असले पाहिजे ,यासाठी आपण ते वक्तव्य केले होते. माझ्या वक्तव्याबद्दल जे परिणाम होतील त्याला मी सामोरा जाण्यास तयार आहे.” अशी रोखठोक भूमिका त्यांनी व्यक्त केली आहे. सध्या बांगलादेशात अल्पसंख्यांक असलेल्या हिंदू,बौद्ध, ख्रिश्चन, शीख समाजावर अत्याचार करण्यात येत आहेत. महिलांवर अत्याचार होत आहेत. अल्पसंख्यांकांच्या धार्मिक स्थळांची तोडफोड करुन विटंबना केली जात आहे. हिंदू सहिष्णू आहे. मात्र याला सीमा आहे. अशा वेळप्रसंगी अन्याय सहन करता कामा नये. असे म्हणत त्यांनी ठणकावले आहे.
तसेच आपला धर्म आणि संस्कृती शांततेच्या मार्गाने चालले आहेत. पण कुणी शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला तर अशावेळेला आपण सुद्धा प्रत्युत्तर देण्याची तयारी ठेवावी, या दृष्टीकोनातून आम्ही जे काही बोललो ते बोललो आहोत. आमचा उद्देश हाच आहे, हिंदूंनी मजबूत आणि संघटित राहावे , असेही स्पष्टीकरण महंत रामगिरी महाराज यांनी दिले आहे.
कोण आहेत रामगिरी महाराज?
गोदावरी नदीच्या किनाऱ्यावरील सराला बेट या ठिकाणी संत गंगागीर महाराजांचा मठ आहे. त्यांच्या वतीने लोकजागृतीच्या उद्देशाने साधारण दीडशे, पावणे दोनशे वर्षांपासून दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी अखंड सप्ताहाचे आयोजन केले जाते. या सप्ताहादरम्यान लाखो लोक उपस्थित असतात. महाराष्ट्रभर मठाच्या अनुयायांचे मोठे जाळे आहे. गंगागिरी महाराज यांचे निधन झाल्यानंतर कीर्तनाची ही परंपरा त्यांच्या शिष्यांनी पुढे सुरू ठेवली आहे. साधारण पंधरा वर्षांपासून रामगिरी महाराज मठाधिपती म्हणून कामकाज पाहत आहेत. ते व्यसनमुक्त समाज, अस्पृश्य निर्मूलन यासारख्या गोष्टींवर या सप्ताहाच्या माध्यमातून भर देत असतात.
नाशिकपासून जवळ असलेल्या सिन्नरमध्ये हरीनाम सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली होती.