आज पुण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लाडकी बहीण या राज्यसरकारच्या योजनेचा शुभांरभ पार पडणार आहे. यासाठी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह अन्य नेतेही उपस्थित असणार आहेत.विरोधी पक्षातील नेत्यांनाही या कार्यक्रमासाठी आमंत्रण देण्यात आले आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ सरकारने जाहीर केली आहे. या योजनेचा लाभ वितरणाचा राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन पुण्यात शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे करण्यात आले आहे. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, तसेच त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे, कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी पात्र महिलांसाठी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेचा आजपासून शुभारंभ होणार आहे. राज्यातील बहिणींना रक्षाबंधनाची गोड भेट म्हणून रक्षाबंधनाच्याआधी दोन दिवस ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्यातील 15 हजाराहून अधिक लाभार्थी प्रातिनिधीक स्वरुपात कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. प्रातिनिधीक स्वरुपात लाभार्थींना रक्कम जमा केल्याचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत पात्र महिलांना प्रतिमाह 1 हजार 500 रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे. जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे एकत्रित 3 हजार रुपये लाभार्थींच्या खात्यावर जमा होण्यास 14 ऑगस्टपासूनच सुरूवात झाली आहे.तसेच पुणे जिल्ह्यातील 5 लाखाहून अधिक लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर या योजनेची रक्कम जमा झाली आहे. लाडकी बहीण योजनेसाठी राज्यात 1 कोटी 56 लाख 61 हजार 209 महिलांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी राज्यात सर्वाधिक पुणे जिल्ह्यातील 9 लाख 74 हजार 66 महिलांनी नोंदणी केली आहे. ऑनलाईनसह ऑफलाईन अर्ज या योजनेसाठी स्वीकारण्यात आले होते.
याच पार्श्वभूमीवर पुणे-सोलापूर, पुणे-सातारा, पुणे-नगर, पुणे-नाशिक, पुणे-मुंबई जुना महामार्ग आणि पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग या सर्व महामार्गांवरील सर्व प्रकारची जड-अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे.
महामार्गांवरील सर्व प्रकारची जड-अवजड वाहतूक बंद राहणार आहे तसेच रात्री बारा वाजेपर्यंत ही वाहतूक बंद राहणार आहे. असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत.
महत्त्वाच्या शासकीय कार्यक्रमाचे ठिकाण मुंबई-बेंगलोर महामार्गालगत असल्यामुळे, या कार्यक्रमासाठी येणाऱ्या बसेसची मोठ्या प्रमाणात महामार्गावर वर्दळ होणार आहे. त्यामुळे कार्यक्रमाच्या निमित्ताने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.या कार्यक्रमासाठी जवळपास ४०००० ते ५०००० जण उपस्थित असणार आहेत, असा अंदाज वर्तवला जात आहे.