उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यात शुक्रवारी रात्री उशिरा साबरमती एक्सप्रेसचे २२ डबे रुळावरून घसरले. कानपूर आणि भीमसेन स्थानकांदरम्यान अनेक डबे दरम्यान या अपघातात कोणीही गंभीर जखमी झालेले नाही. लोको पायलटने दिलेल्या माहितीनुसार रूळावरील वस्तूला इंजिनची धडक बसल्यामुळे सदर अपघात झाला.
प्राथमिक माहितीनुसार, दगड इंजिनवर आदळल्याचे चालक सांगत आहेत. इंजिनच्या कॅटल गार्डचे मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी रात्री उशिरा घटनास्थळी पोहोचले. अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी संपूर्ण ट्रेनचे नुकसान झाले आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
घटनास्थळी पोहोचलेल्या रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, गाडी क्रमांक 19168 साबरमती एक्स्प्रेस वाराणसीहून अहमदाबादला जात असताना कानपूर आणि भीमसेन स्थानकादरम्यान रुळावरून घसरली. कानपूरजवळील गोविंद पुरीसमोर होल्डिंग लाइनवर ट्रेनचे अनेक डबे रुळावरून घसरले. ही ट्रेन वाराणसीहून अहमदाबादला जात होती. पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. दरम्यान साबरमती एक्स्प्रेस ट्रेनमधील सर्व प्रवाशांना अपघातस्थळावरून बसने कानपूरला आणण्यात आले. तिथून त्यांची अहमदाबादला जाण्याची व्यवस्था केली जात आहे.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले, रेल्वेचे इंजिन रुळावर ठेवलेल्या जड वस्तूला धडकले. इंजिनाला जोरदार धडक लागल्याच्या खुणा आहेत. पुरावे सुरक्षित ठेवण्यात आले आहेत. आयबी आणि यूपी पोलीस तपास करत आहेत.
उत्तर मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक उपेंद्र चंद्र जोशी म्हणाले, इंजिनावर काहीतरी आदळल्याने हा अपघात झाल्याचे निश्चित आहे. घटनास्थळी काहीही आढळून आले नाही. अपघाताच्या वेळी ट्रेनचा वेग ७० ते ८० च्या दरम्यान होता. एक चाक बंद पडताच दाब कमी झाला. चालकाने वेळीच आपत्कालीन ब्रेक लावल्याने मोठी दुर्घटना टळली.
कानपूरचे उपजिल्हाधिकारी राकेश वर्मा यांनी सांगितले की, २२ डबे रूळावरून खाली घसरल्याचे दिसत आहे. या घटनेत कुणीही जखमी झालेले नाही.
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, अपघातामुळे या मार्गावरील सात ट्रेन रद्द, तर तीन ट्रेन इतर मार्गावरून वळविण्यात आल्या आहेत.भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षिततेची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना देण्यासाठी आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत.