जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीत एकही मतदार डावलला जाणार नाही यासाठी निवडणूक आयोग जोरदार प्रयत्न करत असल्याचे दिसून आले आहे. यासाठी निवडणूक आयोगाने दल लेकमध्ये 3 तरंगणारी मतदान केंद्रे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय, नियंत्रण रेषेवर एक मतदान केंद्रही उभारण्यात येणार आहे .
एलओसीवर बांधले जाणारे मतदान केंद्र विशेषतः अनुसूचित जमातींसाठी आहे, कारण येथील 100 टक्के लोकसंख्या अनुसूचित जमातीची आहे.
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. काल पत्रकार परिषदेमध्ये मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले की, ही विशेष मतदान केंद्रे उभारण्याचा उद्देश दुर्गम भागांशी संपर्क सुनिश्चित करणे हा आहे. दल सरोवरात बांधलेल्या 3 तरंगत्या मतदान केंद्रांवर पोलिंग पार्टीला बोटींनी नेले जाईल. कुमार म्हणाले की, तीन मतदान केंद्रांपैकी एका केंद्र असलेल्या ‘खार मोहल्ला आबी करपोरा’ मध्ये फक्त 3 मतदार आहेत. गुरेझ विधानसभा मतदारसंघातील कोरागबल मतदान केंद्र भारतीय आणि पाकिस्तानी क्षेत्रांमधील नियंत्रण रेषेवर आहे.
राजीव कुमार म्हणाले की, ‘हे मतदान केंद्र केवळ 100 टक्के अनुसूचित जमाती (एसटी) लोकसंख्येसाठी आहे. लोकसभा निवडणुकीत या मतदान केंद्रावर 80.01 टक्के मतदान झाले होते. सीमारी हे कुपवाडा जिल्ह्यातील पहिले मतदान केंद्र आहे. मात्र रसद आणि सुरक्षा आव्हाने असूनही, मतदानाची टक्केवारी सातत्याने उच्च आहे. ही खरोखरच उत्साहवर्धक बाब आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये दशकभरानंतर विधानसभा निवडणुका होत आहेत. आगामी 18 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान 3 टप्प्यांत येथे मतदान होणार आहे. तर 4 ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे. येथे विधानसभेच्या 90 जागा आहेत. पहिल्या टप्प्यात 18 सप्टेंबरला 24 जागांसाठी, तर दुसऱ्या टप्प्यात 25 सप्टेंबर रोजी 26 जागांसाठी आणि 1 ऑक्टोबरला तिसऱ्या टप्प्यात 40 जागांसाठी मतदान होणार आहे. जम्मू-काश्मीरमधील शेवटच्या विधानसभा निवडणुका नोव्हेंबर-डिसेंबर 2014 मध्ये 5 टप्प्यात झाल्या होत्या.