Sambhaji Bhide : एक वर्षांहून अधिक कालावधीपासून राज्यात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे. सरकारने 10 टक्के आरक्षण दिले आहे. पण, जरांगे-पाटील हे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी करत आहेत. अशातच शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी मराठा आरक्षणाबाबत एक वक्तव्य केलं आहे, जे सध्या सर्वत्र चर्चेत आहे.
मराठा आरक्षण या मुद्यावर बोलताना संभाजी भिडे म्हणाले, “मराठा आरक्षण हा कळीचा मुद्दा आहे. तर मराठे म्हणजे वाघ आणि सिंह आहेत. संपूर्ण जंगल तुमचे आहे. मग मराठ्यांनी आरक्षण मागावे का? मराठ्यांनी उभा देश चालवायचा आहे. आरक्षण कुठे घेऊन बसलाय..” असे संभाजी भिडे म्हणाले आहेत.
दरम्यान, बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात श्री शिवप्रतिष्ठानच्या वतीनं सांगली जिल्ह्यात 25 ऑगस्ट रोजी कडकडीत बंद पाळला जाणार आहे. याची माहिती संभाजी भिडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी संभाजी भिडे यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.
बांगलादेशमध्ये तापलेले राजकीय वातावरण, तिथल्या हिंदूंवर होत असलेले अत्याचार या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कडून 25 रोजी कडकडीत बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदसाठी 20 ऑगस्ट रोजी रॅली काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात असल्याचे संभाजी भिडे म्हणाले आहेत.
लाडकी बहीण योजनेवरही भाष्य!
‘लाडकी बहीण योजने’वरून संभाजी भिडे यांनी शिंदे सरकारचे कौतुक केले आहे. तसेच “मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जरी चांगली असली, तरी त्यात महिलांना मानधन देऊन नव्हे, तर त्यांच्या केसाला धक्का लागणार नाही, याचीही व्यवस्था सरकारनं करावी,” असं संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे.