Droupadi Murmu : भावा-बहिणीच्या नात्यातील प्रेम आणि विश्वासाचे प्रतीक असलेला रक्षाबंधनाचा सण आज संपूर्ण भारतभर साजरा केला जात आहे. या खास दिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी X वर पोस्ट शेअर करत लिहिले, ‘रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्तावर, मी सर्व देशवासियांना शुभेच्छा देते. भाऊ आणि बहिणींमधील प्रेम आणि परस्पर विश्वासाच्या भावनेवर आधारित हा सण सर्व बहिणी आणि मुलींबद्दल आपुलकी आणि आदराची भावना व्यक्त करतो.” पुढे त्यांनी समाजात महिलांची सुरक्षा आणि सन्मान राखण्यासाठी नागरिकांनी शपथ घ्यावी, असे आवाहनही देशवासियांना केले आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले, “या सणाच्या दिवशी सर्व देशवासीयांनी आपल्या समाजातील महिलांची सुरक्षा आणि सन्मान सुनिश्चित करण्याची शपथ घ्यावी अशी माझी इच्छा आहे.”
दरम्यान, रक्षाबंधनाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत. X वर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, ‘भाऊ आणि बहिणीमधील अपार प्रेमाचे प्रतीक असलेला सण रक्षाबंधनाच्या सर्व देशवासियांना खूप खूप शुभेच्छा. हा पवित्र सण तुमच्या नात्यात नवीन गोडवा घेऊन येवो आणि तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि सौभाग्य येवो. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील ‘रक्षाबंधन’ या पवित्र सणानिमित्त सर्व देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. भाऊ-बहिणीतील अतूट प्रेम आणि आपुलकीच्या या सणानिमित्त सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देखील बहीण प्रियंकासोबतचा फोटो पोस्ट करत सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत, “भाऊ आणि बहिणीमधील अतूट प्रेम आणि स्नेहाचा सण रक्षाबंधनाच्या सर्व देशवासियांना खूप खूप शुभेच्छा. हा रक्षणाचा धागा सदैव आपल्या पवित्र नात्याला घट्ट ठेवो.” अशा आशयाची पोस्ट राहुल गांधींनी केली आहे.