Badlapur Crime News : बदलापूर शहरातील नामांकित शाळेत दोन चिमुकलींवर अत्याचार झाल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणानंतर शाळेच्या बाहेर आज सकाळपासूनच शेकडो संतप्त पालक जमले असून ठिय्या आंदोलनाला बसले आहेत. याशिवाय बदलापूरमध्ये ‘रेल रोको’ आंदोलन देखील सुरु आहे, अनेकांनी रेल्वे रुळावर बसून निदर्शने केली, त्यानंतर तोडफोड आणि दगडफेक सुरू केली. त्यामुळे या मार्गावरील लोकल गाड्यांची वाहतूक तब्बल सहा तास विस्कळीत झाली. यानंतर पोलिसांनी या जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला.
दुसरीकडे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी (SIT)ची स्थापना केली आहे. पोलिस महासंचालकांच्या नेतृत्वाखाली पथक या प्रकरणाची चौकशी करणार आहे. सोबतच पोलीस आयुक्तांनी पोलीस ठाण्याला तत्काळ प्रस्ताव तयार करून फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणीसाठी सादर करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
हे प्रकरण ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील शाळेशी संबंधित आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे, मात्र याप्रकरणी शाळा व्यवस्थापनाने पुढे येऊन माफी मागावी, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
यासोबतच विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेची हमी शाळेच्या आत असावी. या शाळेत विद्यार्थिनी सुरक्षित नसल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेला चार दिवस उलटले तरी शाळा व्यवस्थापनाकडून याप्रकरणी कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचा कुटुंबाचा आरोप आहे. चार-पाच वर्षांच्या विद्यार्थिनींचा शाळेतील स्वच्छता कर्मचाऱ्याने शौचालयात विनयभंग केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी या आरोपीसह त्याच्या इतर साथीदारांना अटक केली आहे.
सुनावणी जलदगती होणार
शाळा व्यवस्थापनाने आतापर्यंत मौन बाळगल्याने लोकांचा रोष वाढत आहे. दुसरीकडे, आरोपींना अटक केल्यानंतर न्यायालयीन कारवाई लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रकरण फास्ट ट्रॅकवर पाठवले जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. या घटनेला चार दिवस उलटूनही न्याय मिळत नसल्याचे पाहून मंगळवारी सकाळी शेकडो पालकांनी शाळा गाठून गेट बंद करून आंदोलन सुरू केले. याची माहिती इतरांना मिळताच येथील गर्दी वाढली. यानंतर अचानक मोठ्या संख्येने लोक बदलापूर रेल्वे स्टेशनवर आले आणि त्यांनी रेल रोको आंदोलन सुरू केले.
मुख्याध्यापिका निलंबित
शेकडो लोक रेल्वे रुळांवर बसून घोषणाबाजी करू लागले. त्यामुळे मध्य रेल्वेची लोकल सेवा पूर्णपणे ठप्प झाली. प्रकरण वाढत असल्याचे पाहून शाळा व्यवस्थापनाने मुख्याध्यापकाला तत्काळ निलंबित केले. यानंतर पोलिसांनी लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. याची माहिती मिळताच महाराष्ट्र सरकारही ऍक्शन मोडमध्ये आले आले. राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर म्हणाले की, त्यांनी विभागीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली असून यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनाही कळवले आहे.