महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) २५ ऑगस्टला होणाऱ्या परीक्षेत कृषि विभागाच्या २५८ पदांचा समावेश करण्यासाठी स्पर्धा परीक्षार्थ्यांनी काल रात्री शास्त्री रस्ता येथे आंदोलन केले. नियोजित परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी या वेळी करण्यात आली आहे . यावेळी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विरोधात घोषणा बाजी केली . यावेळी सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.
एमपीएससीतर्फे राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २५ ऑगस्ट रोजी होत आहे. कृषी सेवेतील २५८ पदांचा समावेश याच परीक्षेत करण्याची स्पर्धा परीक्षार्थ्यांची मागणी आहे. मात्र या परीक्षेसंदर्भात २९ डिसेंबर, २०२३ रोजी जाहिरात प्रसिद्ध होईपर्यंत एमपीएससीकडे महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा २०२४ साठीचे मागणीपत्र शासनाकडून प्राप्त झाले नाही. त्यामुळे कृषी सेवेतील पदांचा समावेश जाहिरातीमध्ये करणे शक्य झाले नाही. आता या परीक्षेची तयारी झाली असून, कृषी सेवेच्या मागणीपत्रातील पदांच्या भरती प्रक्रियेबाबत पुढील नियोजन लवकरात लवकर करण्यात येईल, असे एमपीएससीने स्पष्ट केले आहे.
पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांची संख्या देखील मोठी आहे.या सर्व पार्श्वभूमीवर स्पर्धा परीक्षार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेत शास्त्री रस्ता येथे ठिय्या आंदोलन केले. तसेच यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. या ठिकाणी उमेदवारांनी मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी शांततेत आंदोलन करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
दरम्यान, हे सर्व विद्यार्थी आपल्या भूमिकेवर ठाम असून, मागण्या मान्य न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे. विद्यार्थी आणि एमपीएससी यांच्यात निर्माण झालेल्या संघर्षावर राज्य सरकार काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे..