Badlapur School Girl Rape Case : बालवाडीतील दोन मुलींच्या लैंगिक छळाच्या घटनेनंतर महाराष्ट्रातील बदलापूरमध्ये खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी शाळेच्या बाहेर आंदोलन सुरु केले. याशिवाय बदलापूरमध्ये ‘रेल रोको’ आंदोलन देखील सुरु झाले, अनेकांनी रेल्वे रुळावर बसून निदर्शने केली, त्यानंतर तोडफोड आणि दगडफेक सुरू केली. त्यामुळे या मार्गावरील लोकल गाड्यांची वाहतूक तब्बल 10 तास विस्कळीत झाली होती.
10 तासानंतर पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला. त्यानंतर काही वेळातच आंदोलकांना रेल्वे ट्रॅकवरुन हटवण्यात आले. मात्र पोलिसांच्या लाठीचार्जनंतर आंदोलकांनी देखील पोलिसांवर दगडफेक केली.
या संपूर्ण प्रकरणानंतर बदलापूर मधील इंटरनेट बंद करण्यात आले. तसेच या संपूर्ण प्रकरणात आंदोलन करणाऱ्या सुमारे 300 जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तर 40 हून अधिक जणांना अटक केली आहे. अटक केलेल्यांना आज न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे ठाणे पोलिसांनी सांगितले.
या घटनेनंतर मध्य रेल्वे जीआरपीचे डीसीपी मनोज पाटील यांनी परिस्थितीची माहिती देताना सांगितले, आता येथील स्थिती सामान्य असून, रेल्वेची वाहतूकही सामान्य झाली आहे. तसेच कोणत्याही अफवांना वेग येऊ नये म्हणून इंटरनेट सेवा काही दिवस बंद राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ ऑगस्ट रोजी शाळेच्या स्वच्छतागृहात बालवाडीच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाला होता. 16 ऑगस्ट रोजी एका मुलीने आपल्या पालकांना ही घटना सांगितल्यावर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी आरोपी अक्षय शिंदे याला १७ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली होती.
लैंगिक छळ प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले, त्यादरम्यान प्रसारमाध्यमांना न्यायालयाच्या आवारात प्रवेश देण्यात आला नाही.
बदलापुरात नेमके काय घडले?
लहान मुलींवर लैंगिक छळ झाल्याची बातमी मंगळवारी उघडकीस आली, त्यानंतर हजारोंच्या संख्येने संतप्त नागरिक या घटनेच्या निषेधार्थ बदलापूर रेल्वे स्थानकावर जमा झाले, येथे नागरिक ठिय्या आंदोलनाला बसले. त्यामुळे 12 एक्सप्रेस आणि मेल गाड्यांचे मार्ग बदलावा लागला. ३० लोकल गाड्या अंशत: रद्द कराव्या लागल्या आणि काही लांब पल्ल्याच्या गाड्यांचे मार्गही बदलण्यात आले. काल बदलापूर येथील रेल्वे स्थानक तब्बल १० तास बंद होते.
त्यानंतर बदलापूर येथील आंदोलनाला हिंसक वळण लागले आणि संतप्त लोकांनी दगडफेक करून शाळेची तोडफोड केली. बदलापूर रेल्वे स्थानकाजवळही बरेचसे नुकसान झाले. नंतर पोलिसांनी लाठीचार्ज करून आंदोलन संपवले.
पीडित मुलींच्या पालकांनी आरोप केला आहे की, पोलिसांनी 12 तासांनंतर त्यांची तक्रार नोंदवली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासादरम्यान पोलिसांना शाळेत लावण्यात आलेले सीसीटीव्ही काम करत नसल्याचे आढळून आले. मुलींचे स्वच्छतागृह स्वच्छ करण्यासाठी महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती का करण्यात आली नाही, अशी चिंताही पालकांनी व्यक्त केली.
याप्रकरणी शाळेच्या व्यवस्थापनाने मुख्याध्यापक, वर्गशिक्षिका आणि महिला परिचर यांना निलंबित केले आहे. आरोपी स्वच्छता कर्मचारी अक्षय शिंदे याची 1 ऑगस्ट रोजी कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यात आली होती.
या प्रकरणाच्या तपासात निष्काळजीपणा केल्याच्या आरोपाखाली महाराष्ट्र सरकारने एका वरिष्ठ पोलिस निरीक्षकासह तीन पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले. या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे.
तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, त्यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना या प्रकरणाची जलदगती न्यायालयात सुनावणी करण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, आरोपीला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शाळेवर कारवाईचे आश्वासन देत या प्रकरणाची त्वरीत चौकशी केली जाईल आणि दोषींना सोडले जाणार नाही, असेही सांगितले.
या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंह यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत.
या घटनेची माहिती संपूर्ण परिसरातील लोकांना समजताच ते रस्त्यावर उतरले आणि हजारो आंदोलकांनी बदलापूर स्थानकावर रेल्वे रोको आंदोलन केले. त्यामुळे लोकल ट्रेन सेवा ठप्प झाली. लांब पल्ल्याच्या गाड्यांचे मार्ग बदलावे लागले. बदलापूर रेल्वे स्थानकावर आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक करून शाळेच्या इमारतीची तोडफोड केली. पोलिसांनी १० तासांनंतर रेल्वे स्थानकावर आंदोलकांवर लाठीचार्ज करून आंदोलन संपवले.