पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दोन दिवसीय पोलंड दौऱ्यावर रवाना झाले आहेत. गेल्या 45 वर्षांत भारतीय पंतप्रधानांची पोलंडची ही पहिलीच भेट असणार आहे. याआधी 1979 मध्ये पंतप्रधानपदी असताना मोरारजी देसाई तिथे गेले होते. 21 आणि 22 ऑगस्टला मोदी पोलंडमध्ये असतील. त्यानंतर 23 ऑगस्टला मोदी युक्रेनला जाणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोलंड आणि युक्रेनचा दौरा सुरू करण्यापूर्वी पीएम मोदीनी एक्स वर पोस्ट करत म्हंटले आहे की, “मी पोलंड आणि युक्रेनच्या अधिकृत दौऱ्यावर जात आहे. पोलंडसोबतच्या राजनैतिक संबंधांना 70 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हा दौरा असणार आहे.पोलंड हा मध्य युरोपमधील आमचा आर्थिक भागीदार आहे.”
तर युक्रेन भेटीबाबत, पंतप्रधान म्हणाले की, “युक्रेन संघर्षाच्या शांततापूर्ण निराकरणावर राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी त्यांचे विचार सामायिक करण्यासाठी ते उत्सुक आहेत”.
युक्रेन आणि रशियामध्ये सध्या संघर्ष सुरू आहे, या दृष्टिकोनातूनही ही भेट महत्त्वाची ठरणार आहे. पोलंडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. त्यांच्या आगमनाबाबत परदेशी नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
भारत सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) ने 19 ऑगस्ट रोजी जारी केलेल्या प्रसिद्धीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 आणि 22 ऑगस्ट रोजी पोलंडच्या राज्य दौऱ्यावर जाणार आहेत. वॉर्सा येथे पंतप्रधानांचे औपचारिक स्वागत करण्यात येणार आहे. ते पोलंडचे राष्ट्राध्यक्ष आंद्रेज सेबॅस्टियन डुडा यांची भेट घेतील आणि पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील.यानंतर पंतप्रधान पोलंडमधील भारतीय समुदायाशी संवाद साधतील.
यानंतर पंतप्रधान मोदी युक्रेनला भेट देणार आहेत. 1992 मध्ये दोन्ही देशांमध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित झाल्यानंतर भारतीय पंतप्रधानांची युक्रेनची ही पहिलीच भेट असेल. कीवमधील पंतप्रधानांच्या कार्यक्रमांमध्ये द्विपक्षीय संबंधांच्या अनेक पैलूंचा समावेश असेल, ज्यात राजकीय, व्यापार, आर्थिक, गुंतवणूक, शिक्षण, सांस्कृतिक, लोक-लोकांची देवाणघेवाण, मानवतावादी सहाय्य इत्यादी विषयांचा समावेश असेल. . पंतप्रधान मोदी या दौऱ्यात विद्यार्थ्यांसह भारतीय समुदायाशीही संवाद साधतील. पंतप्रधानांच्या युक्रेनच्या या ऐतिहासिक दौऱ्यामुळे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होण्यास आणि विस्तारण्यास मदत होणार आहे.
या संदर्भात परराष्ट्र मंत्रालयातील सचिव (पश्चिम) तन्मय लाल यांनी परराष्ट्र मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले होते की, पंतप्रधान मोदी 21 ऑगस्ट रोजी पोलंडच्या अधिकृत दौऱ्यावर जाणार आहेत.ही भेट अशा वेळी होत आहे जेव्हा दोन्ही देश त्यांच्या राजनैतिक संबंधांच्या स्थापनेचा ७० वा वर्धापन दिनही साजरा करत आहेत. त्यानंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी २३ ऑगस्टला युक्रेनला अधिकृत भेट देणार असल्याचे त्यांनी सांगितले. ही एक ऐतिहासिक भेट ठरेल कारण आम्ही राजनैतिक संबंध प्रस्थापित केल्यापासून 30 वर्षांहून अधिक काळात भारतीय पंतप्रधान युक्रेनला भेट देण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे.