Badlapur School Girl Rape Case : कोलकतामधील हॉस्पिटलमध्ये एका महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेला काही दिवसच उलटले असून, आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बदलापूर शहरातील एका नामांकित शाळेत दोन चिमुकलींवर शाळेतील सफाई कामगाराने अत्याचार केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. संतप्त नागरिकांनी शाळेबाहेर आंदोलन सुरु केले. शिवाय बदलापूरमध्ये ‘रेल रोको’ आंदोलन देखील सुरु केले.
यावेळी आंदोलनाला हिसंक वळण लागल्याचेही पाहायला मिळाले. मंगळवारी संतप्त नागरिकांनी तब्बल १० तास रेल्वे रोको आंदोलन केले. या संपूर्ण घटनेनंतर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. माझी सुरक्षा तातडीने काढून जनतेच्या सुरक्षेसाठी नियुक्त करा, असे त्यांनी म्हंटले आहे.
https://x.com/supriya_sule/status/1826084167144157598
सुप्रिया सुळे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंट ‘एक्स’वर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले, “महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती गेल्या काही महिन्यांपासून अतिशय गंभीर आहे. जनता असुरक्षित वातावरणात जगत असून सततच्या अप्रिय घटनांमुळे नागरिकांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण आहे. महिला, अबालवृद्ध कुणीही सुरक्षित नाहीत. गुन्हेगार निर्ढावले असून कायद्याचा धाक उरलेला नाही. यंत्रणा राबविताना पोलीस यंत्रणेवर प्रचंड मोठा ताण पडतोय, हे स्पष्टपणे दिसत आहे.
दुसरीकडे माझ्यासह अनेक आजी-माजी लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेसाठी मोठी पोलीस यंत्रणा काम करत आहे. परंतु एका बाजूला कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलीस यंत्रणेचं बळ कमी पडत असताना दुसरीकडे ही सुरक्षा घेणं योग्य नाही. म्हणून गृहमंत्र्यांना माझी विनंती आहे की कृपया माझ्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेली पोलीस सुरक्षा तातडीने काढून घ्यावी. माझ्या सुरक्षेसाठी दिलेले हे पोलीस अधिकारी जनतेच्या सुरक्षेसाठी नियुक्त करावेत.
यासोबतच राज्यातील ज्यांना ज्यांना सुरक्षा व्यवस्था दिली आहे त्या सर्वांच्या सुरक्षेच्या गरजेबाबत तातडीने आढावा घ्यावा व ज्यांना गरज नाही, त्यांची सुरक्षा काढून ते पोलीस कर्मचारी जनतेच्या सुरक्षेसाठी देण्यात यावे.
राज्यातील कायदा व सुव्यवस्था चोख राहावी व जनतेला सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी गृहमंत्र्यांनी हा निर्णय तातडीने घ्यावा ही नम्र विनंती.” अशी पोस्ट सुप्रिया सुळे यांनी केली आहे. तर दुसरीकडे आज पुण्यात बदलापूर अत्याचार घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले आहे.