Badlapur School Girl Rape Case : बालवाडीतील दोन मुलींच्या लैंगिक छळाच्या घटनेनंतर महाराष्ट्रातील बदलापूरमध्ये खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर मंगळवारी संतप्त नागरिकांनी शाळेच्या बाहेर आंदोलन सुरु केले. याशिवाय बदलापूरमध्ये ‘रेल रोको’ आंदोलन देखील सुरु झाले, अनेकांनी रेल्वे रुळावर बसून निदर्शने केली, त्यानंतर तोडफोड आणि दगडफेक सुरू केली. त्यामुळे या मार्गावरील लोकल गाड्यांची वाहतूक तब्बल 10 तास विस्कळीत झाली होती. यानंतर पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला. त्यानंतर काही वेळातच आंदोलकांना रेल्वे ट्रॅकवरुन हटवण्यात आले.
मात्र पोलिसांच्या लाठीचार्जनंतर आंदोलकांनी देखील पोलिसांवर दगडफेक केली. बदलापूरमधील या जनआक्रोश आंदोलनाने सरकारला हलवून सोडलय. आजही या घटनेचे पडसाद उमटताना दिसत आहेत.
या घटनेननंतर सरकार डॅमेज कंट्रोलच्या मोडमध्ये आहे. बदलापूरच्या शाळेत घडलेल्या घटनेपासून धडा घेत मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मोठी घोषणा केली आहे. बदलापूरच्या शाळेत जो प्रकार घडला तो पुन्हा घडू नये म्हणून सरकारने काही पाऊले उचलली आहेत. सरकराने एक नियमावली जारी केली असून, या नियमाचे पालन सर्व शाळांना करावे लागणार आहे.
मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी शाळांसाठी कोणती नियमावली जारी केली?
1. कर्मचाऱ्यांमध्ये बस चालक, वाहक, सुरक्षा कर्मचारी, कॅन्टीनमधील कर्मचारी या सगळ्यांचा समावेश.
2. मुंबईतील प्रत्येक शिक्षण संस्थेत महिला स्वच्छतागृहाजवळ महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत.
3. प्रत्येक शाळेत आत्मरक्षाशी निगडीत अभियानाची सुरुवात केली जाणार आहे.
4. प्रत्येक महिन्याला मुलींच्या सुरक्षेचा आणि आरोग्याचा आढावा घेतला जाणार.
5. शाळेतील प्रत्येक कर्मचाऱ्यांचे पोलीस वेरिफिकेशन करण्याचे आदेश.
6. शाळेत महिला पालकांची आणि शाळेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती स्थापन करणार.