बदलापूरमधील दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या अमानवी अत्याचाराने महाराष्ट्राला हादरवून टाकले आहे. शाळेतील स्वच्छता कर्मचाऱ्याने शाळेच्या स्वच्छतागृहात या मुलींवर केलेल्या लैंगिक अत्याचारामुळे जनतेमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या निषेधार्थ बदलापूरमधील नागरिकांनी काल रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन केले. आंदोलकांनी बदलापूर रेल्वे स्टेशनवर रेल्वे रोको आंदोलन करत न्यायाची मागणी केली, ज्यामुळे 11 तासांहून अधिक वेळ वाहतूक ठप्प झाली होती. .
या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले आहेत. विरोधी पक्षांनी या घटनेच्या पार्श्वभूमीवर सरकारवर तीव्र टीका केली आहे. चिमुकल्यांना न्याय मिळावा, या मागणीसाठी महाविकास आघाडीने येत्या 24 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. आघाडीचे सर्व पक्ष या बंदमध्ये सहभागी होणार असून, राज्यभरातून या बंदला व्यापक प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, कल्याण वकील संघटनेने या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचे वकीलपत्र घेण्यास ठाम नकार दिला आहे. आरोपी अक्षय शिंदेंचे वकीलपत्र घेणार नाही असा निर्णय कल्याण जिल्हा न्यायालय वकील संघटनेच्या बैठकीत घेतला आहे. संघटनेने स्पष्ट केले आहे की,आम्ही आरोपीच्या विरोधात केस लढणार आहोत. तसेच, पोलिसांच्या चुकीमुळे झालेल्या आंदोलनातील अटक करण्यात आलेल्यांच्या बाजूनेही आम्ही न्यायालयात मोफत केस लढणार असल्याची भूमिका त्यांनी मांडली आहे.
दरम्यान, बदलापूरमधील या प्रकरणाने राज्यातील जनतेमध्ये संतापाची लाट उसळली असून, आरोपीला कठोर शिक्षा मिळावी, अशी मागणी सर्व स्तरांमधून करण्यात येत आहे.