Devendra Fadanvis : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) २५ ऑगस्टला होणाऱ्या परीक्षेत कृषि विभागाच्या २५८ पदांचा समावेश करण्यासाठी स्पर्धा परीक्षार्थ्यांनी काल रात्री पुण्यातील शास्त्री रस्ता येथे ठिय्या आंदोलन केले आणि परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली. यावेळी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विरोधात घोषणा बाजी देखील केली.
विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून कृषी जागांसाठी स्वतंत्र परीक्षा घेतली जाईल, असे सांगितले होते. आता याच मुद्यावर तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी X वर पोस्ट शेअर सांगितले की, “आयबीपीएस परीक्षा आणि एमपीएससीची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही 25 ऑगस्ट रोजी एकाच दिवशी आल्या आहेत. तसेच कृषी विभागाच्या 258 जागांचा समावेश राज्य सेवा पूर्व परीक्षेत झालेला नाही. या दोन्ही कारणांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे, त्यामुळे याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांना केली आहे. आज दुपारी तीन वाजता एक बैठक घेऊन त्यात यावर निश्चितपणे विचार करण्यात येईल, असे त्यांनी मला आश्वस्त केले आहे.” अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
https://x.com/Dev_Fadnavis/status/1826170351149060150
एमपीएससीतर्फे राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २५ ऑगस्ट रोजी होत आहे. कृषी सेवेतील २५८ पदांचा समावेश याच परीक्षेत करण्याची स्पर्धा परीक्षार्थ्यांची मागणी आहे. मात्र या परीक्षेसंदर्भात २९ डिसेंबर, २०२३ रोजी जाहिरात प्रसिद्ध होईपर्यंत एमपीएससीकडे महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा २०२४ साठीचे मागणीपत्र शासनाकडून प्राप्त झाले नाही. त्यामुळे कृषी सेवेतील पदांचा समावेश जाहिरातीमध्ये करणे शक्य झाले नाही. आता या परीक्षेची तयारी झाली असून, कृषी सेवेच्या मागणीपत्रातील पदांच्या भरती प्रक्रियेबाबत पुढील नियोजन लवकरात लवकर करण्यात येईल, असे एमपीएससीने स्पष्ट केले आहे.