Badlapur School Girl Rape Case : एकीकडे महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने राजकीय वातावरण तापल्याचं दिसत असतानाच बदलापूरमधील बलात्काराच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. बदलापूर प्रकरणाचे पडसाद राज्यासह देशाच्या राजकीय वर्तुळातही उमटत आहेत. राजकीय नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाची मालिका सुरु आहे. अशातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी या प्रकरणात आपल्या कार्यकर्त्यांना महत्त्वपूर्ण आवाहन केले आहे.
राज ठाकरे यांनी बदलापुरातील मनसे पक्षातील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आणि नेत्यांना व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून आवाहन केले आहे. राज ठाकरे यांनी याबाबतचा व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया पेजवर देखील शेअर केला आहे. “राज ठाकरेंनी पीडित मुलींना कुणी भेटायला जाणार नाही याची काळजी घेण्याचं आवाहन कार्यकर्त्यांना केलं आहे. ते म्हणाले, आता एकच गोष्टीची काळजी घ्या. सारखे सारखे लोक येतील आणि त्या मुलींना व त्यांच्या घरच्यांना भेटून छळतील. त्या मुलींना आयुष्यभराचा त्रास देतील. त्यांचं घर कुणाला कळणार नाही, त्यांचं नाव कळणार नाही याची दक्षता घ्या. पोलिसांशी बोलून घ्या. त्यांच्या घरी कुणी जाणार नाही, त्यांना छळणार नाही, त्या मुलींना कुणी त्रास देणार नाही याची काळजी घ्या. त्या दोघींच्या पुढे आयुष्य पडलंय. त्या मुली लहान आहेत.” असे राज ठाकरे म्हणाले आहेत.
पुढे म्हणाले, या सगळ्या प्रकरणात इतर कुणी राजकारणी भेटतील किंवा काय करतील मला माहिती नाही. पण आपल्याकडून ही गोष्ट होता कामा नये. त्यांच्या घरच्यांनाही आधार द्या. त्यांना समजावून सांगा. त्या मुलींना त्रास होणार नाही एवढं फक्त बघा, असं आवाहन राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना केले आहे.
बदलापूर मधील एका प्रसिद्ध शाळेत बालवाडीतील दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. या घटनेनंतर राज्यातील अनेक ठिकाणी आंदोलनं सुरु झाली आहेत, या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून, कारवाई सुरु आहे.