बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटताना दिसत आहेत. शाळेतील दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून आरोपी अक्षय शिंदे याला अटक करण्यात आली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने याबाबत दखल घेतली असून कोर्टात या प्रकरणी सुनावणी सुरू आहे. या सुनावणीवेळी कोर्टाने शाळा प्रशासन आणि पोलिसांना कडक शब्दात खडेबोल सुनावले आहेत. या प्रकरणात पोलिसांकडून एकाच मुलीचे स्टेटमेंट घेण्यात आले होते. यावरुनच बदलापूर पोलीस इतके बेजबाबदार कसे वागू शकतात आणि दुसऱ्या मुलीचे स्टेटमेंट अजून का घेतले नाही असा प्रश्न न्यायाधीश पृथ्वीराज चव्हाण यांनी विचारला आहे.
तसेच दुसऱ्या मुलीचे स्टेटमेंट आजची आज रेकॉर्ड करा असे आदेशही न्यायाधीशांनी दिले आहेत. न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण आणि न्यायमूर्ती रेवती मोहिते – डेरे यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी सुरू आहे. सरकारकडून महाधिवक्ता बिरेंद्र सराफ बाजू मांडण्याचे काम करत आहेत.
याचसोबत कोर्टाने शाळा प्रशासनाच्या गलिच्छ कारभारावरही ताशेरे ओढले आहेत. यासोबत या प्रकरणात शाळा संचालकांनी सुद्धा कसल्याच प्रकारचे लक्ष दिलं नाही असे देखील कोर्टाने खडेबोल सुनावले आहेत.
दरम्यान, आता दुसऱ्या मुलीच्या वडिलांचे स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यात आल्याचे महाधिवक्ते बिरेंद्र सराफ यांच्याकडून सांगण्यात आले आहे.