पावसाळा आला की पुण्यातील रस्त्याच्या दर्जाहीन कामांमुळे एक, दोन पावसात रस्ते खड्डेमय होतात. त्यासंदर्भात अनेक वेळा तक्रार करुन त्यांची दखल घेतली जात नाही. परंतु आता पुणे महानगरपालिकेने अनोखा योजना आणली आहे. पुणेकरांना आता खड्ड्यांची तक्रारव्हॉट्सअॅपद्वारे करता येणार आहे. पुणे महानगरपालिकेकडून खड्ड्यांची तक्रार करण्यासाठी हेल्पलाइन नंबर दिला आहे. या क्रमांकावर तक्रार केल्यास 24 तासांत खड्डा बुजविला जाणार असल्याचा दावा पुणे मनपाने केला आहे.
तसेच नागरिकांना पीसीआरएस या अॅपवर खड्डयांची तक्रार नोंदविता येणार आहे. या तक्रारीची दखल घेऊन तीन दिवसात खड्डे बुजविण्यात येणार असल्याचा दावा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आला आहे.
गुगल प्ले स्टोअर वरून नागरिकांना पीसीआरएस या अॅप डाऊनलोड करावे लागणार आहे. पीडब्ल्यूडीने महाराष्ट्र रिमोट सेंन्सिंग ॲप्लिकेशन सेंटरच्या (एमआरएसएसी) सहाय्याने पीडब्ल्यूडीच्या अखत्यारीत येणारे एक लाख १८ हजार कि.मी. पेक्षा जास्त रस्त्यांचे जाळे तयार करून त्याचा या अॅपमध्ये समावेश केला आहे.
तक्रारदाराला जीपीएस लोकेशन सुरू ठेऊन केवळ महामार्गावरील खड्ड्यांचे दोन छायाचित्र टाकल्यानंतर संबंधित विभागातील कनिष्ठ अभियंता, कार्यकारी उपअभियंता आणि कार्यकारी अभियंत्यांच्या मोबाईलमधील अॅपमध्ये दिसणार आहे.
शहरातील खड्डे बुजवण्याच्या कामास आणखी वेग देण्याचे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिले आहे. त्यानंतर पुणेकरांना खड्ड्यांपासून दिलासा देण्यासाठी महापालिकेत त्यांनी बैठक घेतली होती. त्या बैठकीत शहरात खड्डे बुजवण्याचे आणि पॅच वर्कच्या कामाला वेग देण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. .