दरवर्षीप्रमाणे यावर्षीही उत्तर प्रदेशातील मथुरा या ठिकाणी कृष्ण जन्माष्टमीची तयारी जोरदार सुरू आहे. मथुरा हे भारतातील सर्वात प्राचीन आणि सुप्रसिद्ध शहर आहे.भगवान श्रीकृष्ण यांचे ते जन्मगाव म्हणून ओळखले जाते. दरवर्षी मोठ्या उत्साहात मथुरा येथे कृष्ण जन्माष्टमी साजरी केले जाते. यावर्षी देखील मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावामध्ये या तयारीला सुरवात झाली आहे.
भाविकांच्या गर्दीचे व्यवस्थापन आणि भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांकडून व्यवस्था करण्यात आली असल्याची मथुराचे पोलीस उपअधीक्षक शैलेश पांडे यांनी माहिती दिली आहे. इथे भाविकांची सतत गर्दी असते. त्यामुळे श्री कृष्ण जन्मस्थान मंदिर आणि बांके बिहारी मंदिर या ठिकाणी भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस बंदोबस्त करण्यात येणार आहे.
यावेळी बोलताना भाविकांनी सुरक्षा व्यवस्थेचे पालन करून अधिकाऱ्यांना सहकार्य करावे अशी विनंती देखील पोलीस उपाधीक्षक शैलेश पांडे यांनी केली आहे. मथुरेतील श्रीकृष्ण जन्मस्थानाजवळ चारही दिशांनी येणारी वाहने थांबवली जातील. त्याचबरोबर वृंदावन आणि सर्व भाविकांसाठी ३२ पार्किंग तयार करण्यात येणार आहेत. असेही त्यांनी सांगितले आहे.
उत्तर प्रदेशचे पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री जयवीर सिंग यांनी २६ ऑगस्टला कृष्ण जन्माष्टमी भव्य, श्रद्धेने आणि मोठ्या थाटामाटात साजरी केली जाईल असे सांगितले आहे.
याचसोबत पुजारी पंडित गौरांग शर्मा यांनी सांगितले आहे की, भगवान श्रीकृष्णाचा जन्म अष्टमीच्या दिवशी रोहिणी नक्षत्रात झाला आहे आणि यंदा हे नक्षत्र सोमवारी २६ ऑगस्ट रोजी पहाटे २:०० वाजेपर्यंत आहे म्हणूनच कृष्ण जन्माष्टमी 26 ऑगस्टला साजरी केली जाईल .
26 ऑगस्ट रोजी मथुरा येथे कृष्ण जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे, तर 27 ऑगस्ट रोजी वृंदावन येथील ठाकूर बांके बिहारी मंदिरात जन्माष्टमी उत्सव साजरा केला जाणार आहे. यानंतर 28 ऑगस्ट रोजी बांके बिहारी मंदिरात नंद उत्सवाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे देखील सांगितले आहे.
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मिरवणूकही काढण्यात येणार आहे. उत्तर प्रदेश ब्रिज तीर्थ विकास परिषदेतर्फे जन्मभूमी आणि वृंदावन येथे साजरी करण्यात येणारी या शोभा यात्रेची व्यापक तयारी सुरु आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या सोहळ्यात सहभागी होतील असे सांगितले जात आहे.