Mamata Banerjee : कोलकाता मधील आरजी कार मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येवरून झालेल्या गदारोळानंतर आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून एक मोठी मागणी केली आहे.
ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात बलात्काराच्या दोषींना शिक्षा तसेच कठोर कायद्याची मागणी केली आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार अलपान बंदोपाध्याय यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या महिन्याच्या सुरुवातीला कोलकाता येथील सरकारी आरजी कार मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये एका महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी देशभरात झालेल्या निषेधानंतर ममता बॅनर्जी यांनी हे पत्र लिहिले आहे.
कडक कायदा करण्याची मागणी
देशभरात होत असलेल्या बलात्काराच्या घटना लक्षात घेऊन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पत्रात लिहिले की, उपलब्ध आकडेवारीनुसार दररोज सुमारे 90 बलात्काराच्या घटना घडतात. अनेक घटनांमध्ये तर बलात्कार पीडितांची हत्याही केली जाते.
अशास्वरूपाच्या गंभीर आणि संवेदनशील विषयावर सर्वंकष पावले उचलण्याची गरज आहे. अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींना कठोर शिक्षा व्हावी. यासाठी कठोर शिक्षेची तरतूद असलेला केंद्रीय कायदा केला पाहिजे. प्रस्तावित कायद्यात अशा प्रकरणांमध्ये जलद सुनावणीसाठी जलदगती विशेष न्यायालये स्थापन करण्याचाही विचार केला पाहिजे. जलद न्याय सुनिश्चित करण्यासाठी, अशा प्रकरणांची सुनावणी 15 दिवसांच्या आत पूर्ण करणे आवश्यक आहे, असेही ममता बॅनर्जी यांनी पत्रात म्हटले आहे.
दरम्यान, कोलकाता येथे घडलेल्या घटनेनंतर पश्चिम बंगालमध्ये भाजपकडून ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. अशातच ममता बॅनर्जी यांचे मोदींना लिहिले पत्र चर्चेत आहे.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पोलिसांना दिलेली मुदत संपण्यापूर्वीच कोलकाता उच्च न्यायालयाने महिला डॉक्टर बलात्कार हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला होता. या घटनेने घेरलेल्या ममता बॅनर्जी यांनी 16 ऑगस्टला कोलकात्यात मोर्चा देखील काढला होता. यामध्ये त्यांनी दोषींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली होती.