Rupali Chakankar : मागील काही महिन्यांपासून राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. बदलापूर येथील घटनेनंतर अख्या महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. अशातच आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून रूपाली चाकणकर यांची हकालपट्टी करावी अशी मागणी केली जात आहे. रुपाली चाकणकर या पीडितांना न्याय मिळवून देण्याचे सोडून बेताल वक्तव्य करीत आहेत. त्यामुळे त्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी पुण्यातील महिला संघटनांच्या प्रतिनिधींकडून करण्यात आली आहे
पुणे शहरातील कार्यरत असलेल्या महिला संघटनांच्या प्रतिनिधींकडून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे लेखी निवेदनाद्वारे चाकणकर यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. शिष्टमंडळाकडून हे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना देण्यात आले आहे.
बदलापूर, लातूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर आदी शहरांत झालेल्या महिला आणि बाललैंगिक अत्याचाराच्या घटनांच्या अनुषंगाने सर्वत्र अत्यंत संताप व्यक्त केला जात असतानाच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मात्र पीडित कुटुंबियांनीच मुलींकडे लक्ष द्यावे, अशी वक्तव्य केलेली आहेत. त्यांचे हेच वक्तव्य आता त्यांना महागात पडल्याचे दिसत आहे, त्यांच्या अशा वक्तव्यामुळे त्यांची पदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
त्यांची ही वक्तव्य अत्यंत धक्कादायक आणि निंदाजनक असल्याने चाकणकर यांच्यावर कारवाई करावी, अशी अपेक्षा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. राज्याच्या मुख्य सचिवपदी, तसेच राज्याच्या पोलीस महासंचालक पदावर महिला अधिकारी कार्यरत असताना या घटनांकडे प्रशासकीय अधिकारी दुर्लक्ष करत आहेत हे अशोभनीय आहे, असंही निवेदनात म्हंटले आहे.