Tripura Rain : त्रिपुरा गेल्या काही दिवसांपासून पाऊस, भूस्खलन आणि पूर यांसारख्या नैसर्गिक संकटाशी झुंज देत आहे. 21 ऑगस्टच्या रात्रीही अनेक भागात पुन्हा पूर आला. त्रिपुराची राजधानी आगरतळा येथे 21 ऑगस्ट रोजी 24 तासांत 233 मिमी अतिवृष्टीची नोंद झाली. हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, येथे पुढील चार दिवस आणखी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
लष्कराने शुक्रवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांनी त्रिपुरातील 330 हून अधिक लोकांची सुटका केली आहे. याशिवाय पूरग्रस्त भागात आसाम रायफल्सचे जवान तैनात करण्यात आले आहेत.
त्रिपुरामध्ये गेल्या काही दिवसांत मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे 22 जणांचा मृत्यू झाला आहे तर काही लोक अजून बेपत्ता आहेत. त्याच वेळी, पावसामुळे अनेकांची घरे उद्ध्वस्त झाल्याने 65,400 लोकांनी राज्यातील 450 मदत छावण्यांमध्ये आश्रय घेतला आहे.
दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत प्रत्येक पीडित कुटुंबाला 4 लाख रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे.
IMD नुसार, शुक्रवारी त्रिपुरामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याचवेळी, खराब हवामानामुळे शुक्रवारी राज्यभरातील सर्व शैक्षणिक संस्था बंद राहतील, असे अधिकृत आदेशात म्हटले आहे.
४० कोटींची मजुरी
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांच्याशी येथील पूरस्थितीबाबत बोलून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांच्या एक्स खात्यावर लिहिले, ‘त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांशी बोललो आणि राज्यातील पूरस्थितीचा आढावा घेतला. स्थानिक सरकारला मदत आणि बचाव कार्यात मदत करण्यासाठी केंद्र सरकारने बोटी आणि हेलिकॉप्टर व्यतिरिक्त एनडीआरएफ टीम पाठवली आहे. गरज भासल्यास केंद्राकडून शक्य ती सर्व मदत केली जाईल. संकटाच्या या काळात मोदी सरकार त्रिपुरातील आमच्या बहिणी आणि भावांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. पुढे त्यांनी पूरग्रस्त त्रिपुरासाठी केंद्राने ४० कोटी रुपये देण्यास मंजुरी दिली असल्याचे सांगितले.