Kamala Harris : अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी औपचारिकपणे डेमोक्रॅटिक पक्षाची उमेदवारी स्वीकारली आहे. अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होणार आहेत. हॅरिस आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात या निवडणुकीत चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.
भारतीय-आफ्रिकन वंशाच्या हॅरिस यांनी गुरुवारी रात्री शिकागो येथे ‘डेमोक्रॅटिक नॅशनल कन्व्हेन्शन’ दरम्यान उमेदवारी स्वीकारली. यासह त्या राष्ट्रपतीपदाची उमेदवार बनणाऱ्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या दुसऱ्या महिला नेत्या ठरल्या. यावेळी त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरही निशाणा साधला आहे.
अमेरिका आणि जगभरातील लाखो प्रेक्षकांना संबोधित करताना कमला म्हणाल्या, “आम्हाला विजयासाठी काम करावे लागेल. गेल्या काही आठवड्यात मी इथपर्यंत पोहोचण्यासाठी केलेला प्रवास माझ्या अपेक्षेपलीकडचा आहे. माझा प्रवास माझ्या आईसारखाच अद्भुत आणि आव्हानात्मक आहे. मला रोज त्यांची आठवण येते. मी अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी ही उमेदवारी स्वीकारते” असे त्यांनी म्हटले.
कमला पुढे हॅरिस म्हणाल्या की, “मी सर्व अमेरिकन नागरिकांना राष्ट्राध्यक्ष होण्याचे वचन देते. देशाला पुढे नेण्यासाठी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू शकता. देशाला जोडणारा राष्ट्रपती होईन. एक राष्ट्रपती जो वाचू शकतो आणि ऐकू शकतो, एक राष्ट्रपती ज्याला कॉमन सेन्स देखील असेल.” असे म्हणत त्यांनी नाव न घेता डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला आहे.
जर कमला हॅरिस या निवडणुकीत निवडून आल्या तर त्या अमेरिकेच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष असतील. अमेरिकेच्या पहिला महिला राष्ट्राध्यक्ष बनून त्या इतिहास रचतील, अशातच सर्व देशांचे लक्ष अमेरिकेच्या या निवडणुकीकडे लागून आहे.