राज्यसभेच्या दोन जागांचीच चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत होती. भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच इतर अनेक अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज केले होते. आता भाजपाचे धैर्यशील पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नितीन पाटील या दोघांची या जागेसाठी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
निवडणुकीत दोन अपक्षांनी तीन उमेदवारी अर्ज दाखल केले होते परंतु अर्ज पडताळणीवेळी या अर्जांवरती अनुमोदक या ठिकाणी सही नसल्यामुळे हे अर्ज बाद करण्यात आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नितीन पाटील आणि भाजपा पक्षाकडून धैर्यशील पाटील उभे होते. या दोघांचीच आता राज्यसभेवर नियुक्ती झाली आहे.
राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा अजित पवार यांनी साताऱ्यातील वाई येथे लोकसभा निवडणुकीदरम्यान बैठक घेतली होती या बैठकीत त्यांनी सांगितले होते की जर महायुतीचा उमेदवार साताऱ्यातील जागेवर निवडून आला तर नितीन पाटील यांना खासदार करतो. वाई महाबळेश्वरचे आमदार मकरंद पाटील यांचे बंधू नितीन पाटील हे आहेत.
अजित पवार यांनी दिलेले आश्वासन पाळत राज्यसभेला नितीन पाटील यांना संधी दिली. नितीन पाटील यांना राज्यसभेच्या निवडणुकीत तिकीट दिले. नितीन पाटील हे आता राज्यसभेचे खासदार होणार आहेत.
दरम्यान, भाजपाने माजी आमदार धैर्यशील पाटील यांना उमेदवारी दिली होती. रायगड जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे धैर्यशील पाटील हे जिल्हाध्यक्ष आहेत. आता राज्यसभेतून ते खासदार होणार आहेत.