Pune Rain Update : मोठ्या विश्रांतीनंतर पुण्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. शुक्रवार पासून पावसाने पुण्यात हजेरी लावली. आजही सकाळपासून पाऊस सुरु असून, खडकवासला धरणातील पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. अशातच खडकवासला धरणातून दुपारी १ वा. मुठा नदी पात्रात ६ हजार ४४६ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी नदी पात्रात उतरू नये, तसेच योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन खडकवासला पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, राज्यात शनिवार ते मंगळवार या चार दिवसांत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे, राज्यातील सर्वच जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. पुणे, मुंबई, पालघरसह इतर 13 जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर इतर जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
राज्यात थोड्याशा विश्रांती नंतर पुन्हा पावसाचे आगमन झाले आहे, हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील विविध भागात जोरदार पाऊस पडणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. अशास्थितीत नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचे देखील आवाहन करण्यात आले आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील घाट परिसरासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर कोल्हापूर आणि साताऱ्यातील घाट परिसरात देखील जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच घाट परिसर सोडता शहरी भागातही हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.