बदलापूर मध्ये घडलेल्या घटनेचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी या घटनेच्या निषेधार्थ मोर्चे काढण्यात आले. अनेक ठिकाणी आंदोलने देखील करण्यात आली. याच घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती.
महाविकास आघाडीकडून देण्यात आलेली महाराष्ट्र बंदची हाक ही बेकायदेशीर आहे असे मुंबई उच्च न्यायालयाने सांगितले. यानंतर महाराष्ट्र बंदची हाक मागे घेण्यात आली.
महाराष्ट्र बंदची हाक मागे घेतली असली तरी, आज महाविकास आघाडीकडून ठिकठिकाणी निषेध आंदोलन करण्यात येत आहेत. ठाकरे गटाकडून दादरच्या शिवसेना भवन परिसरात निषेध आंदोलन करण्यात आले. त्यादरम्यान बोलताना उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे.
शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी तोंडाला काळा मास्क, तर दंडावर काळी फित बांधून निषेध व्यक्त केला. उद्धव ठाकरेंसोबत येथे पत्नी रश्मी ठाकरे, सुपुत्र आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊतही उपस्थित होते.
यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले, “अत्याचार करणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे. पण त्याही पेक्षा या प्रकरणावर पांघरूण घालणाऱ्यांनाही शिक्षा झाली पाहिजे. आज महाराष्ट्र बंद कडकडीत झाला असता, याची जाणीव सत्ताधाऱ्यांना झाली होती. त्यांच्यात संकटांचा सामना करण्याची हिंमत नाही. त्यामुळे त्यांनी आपले चेलेचपाटे कोर्टात पाठवले आणि अडथळे निर्माण केले. गेल्या आठवड्यात भारत बंद काही राज्यात पुकारला. त्यावेळी रेल्वे बंद झाल्या होत्या. तेव्हा याचिकाकर्ते कुठे गेले होते. बंदला विरोध करणारे याचिकाकर्तेही तितकेच विकृत आहेत. इथे काही सरकारचे ‘सदा’आवडते आहेत. त्यांच्या माध्यमातून हा बंद होऊ नये यासाठी कोर्टात गेले. खरं तर महाराष्ट्र बंद विरोधात हायकोर्टात डॉक्टर गुणरत्न सदावर्ते यांनी याचिका दाखल केली होती.
पुढे बोलताना ठाकरे म्हणाले, “महिला जाब विचारत आहेत, आमच्या सुरक्षेच्या आड का येताय? पण हे आंदोलन थांबता कामा नये. बस डेपो, रिक्षा स्टँड, चौकात स्वाक्षरी मोहीम घ्या. बहीण सुरक्षित तर घर सुरक्षित. बहिणींवर अत्याचार होत आहेत आणि कंस मामा राख्या बांधत फिरत आहेत. राखी बांधण्यात आडकाठी येऊ नये म्हणून आमच्या आंदोलनात आडकाठी करत आहेत. इतकं निर्लज्ज सरकार महाराष्ट्राने पाहिलं नव्हतं. हा संस्कारक्षम महाराष्ट्र आहे,”
दरम्यान, पुण्यात शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत एक तासाचे मुक आंदोलन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे करण्यात आले.