Nepal Bus Accident : नेपाळमध्ये शुक्रवारी झालेल्या बस अपघातातील मृतांची संख्या 27 वर पोहोचली आहे. या अपघातात ठार झालेल्या २४ मृतदेहांची ओळख पटली असून ते महाराष्ट्रातील रहिवासी आहेत. आता हे सर्व मृतदेह शनिवारी भारतीय हवाई दलाच्या विमानाने महाराष्ट्रात आणण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री कार्यालयानेही याला दुजोरा दिला आहे.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि इतर अधिकाऱ्यांशी दिल्लीत चर्चा केली. मृतदेह परत आणण्यासाठी नोडल ऑफिसरचीही नियुक्ती करण्यात आली आहे.
गृहमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर विमानाची व्यवस्था
मुख्यमंत्री कार्यालयाने सांगितले की, गृहमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर भारतीय हवाई दलाच्या विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे, जे शनिवारी मृतदेह महाराष्ट्रात आणतील. या घटनेतील ठार झालेले नागरिक जळगाव जिल्ह्यातील वरणगाव, दरियापूर, तळवेल आणि भुसावळ येथील आहेत.
24 ऑगस्टच्या संध्याकाळी मृतदेह आणि जखमी प्रवाशांना गोरखपूरला आणले जाईल, परंतु त्यांना व्यावसायिक विमानाने महाराष्ट्रात परत आणणे शक्य नाही, त्यामुळे हवाई दलाच्या विमानांची व्यवस्था करण्यात आली.
उपचारादरम्यान 11 प्रवाशांचा मृत्यू झाला
पीटीआयच्या वृत्तानुसार या घटनेत 16 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 11 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गोरखपूर क्रमांकाची बस पोखराहून काठमांडूला जात असताना तनहुन जिल्ह्यातील ऐना पहारा येथे महामार्गावर उलटली. या बसमध्ये चालक आणि दोन सहाय्यकांसह 43 जण होते. जखमींना त्रिभुवन विद्यापीठाच्या अध्यापन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.