पुण्यातील पौड परिसरात एक हेलिकॉप्टर कोसळले असल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना आज (शनिवार, 24 ऑगस्ट) दुपारी 3 च्या सुमारास घडली. हेलिकॉप्टरमध्ये पायलटसह एकूण चार लोक असल्याची प्राथमिक माहिती आहे. खराब हवामानामुळे ही दुर्घटना घडली असावी, असे सांगितले जात आहे. मात्र हेलिकॉप्टर नेमके कोणत्या कंपनीचे आहे. त्यात किती आणि कोण व्यक्ती होत्या. याबाबत कोणतीही माहिती अद्याप पुढे आली नाही.
पण ही घटना घडली तो भाग अतिपर्जन्यवृष्टीचा परिसर म्हणून ओळखला जातो. आज पुणे जिल्ह्यातही मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे या अपघातास पाऊस आणि खराब हवामान कारणीभूत ठरले असावे, असा प्राथमिक तर्क काढला जातो आहे. तांत्रिक बिघाडामुळे हेलिकॉप्टर कोसळले असून ते मुंबईहून विजयवाड्याला जात होते अशी माहिती समोर आली आहे.
काही स्थानिक नागरिकांनी हेलिकॉप्टर कोसळताना प्रत्यक्ष पाहिले. हेलिकॉप्टर कोसळल्यामुळे मोठा आवाज झाला. आवाजाच्या दिशेने स्थानिक नागरिक धावले असता त्यांना कोसळलेल्या हेलिकॉप्टरचा सांगाडा पहायला मिळाला. दरम्यान, हेलिकॉप्टरमधून पायलट बाहेर आल्याचे पाहिले. त्यानंतर त्यांनी पायलटला आणि पीडितांना मदत आणि बचावकार्य पुरवले असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान प्रशासनही अपघातस्थळी मदतीकरता पोचले आहे.