Ajit Pawar : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज जळगावात ‘लखपती दीदी’ हा मेळावा होत आहे. पंतप्रधान या कार्यक्रमांतर्गत 11 लाख नवीन लखपती दीदींचा सन्मान करणार आहेत. तसेच त्यांना प्रमाणपत्र देणार आहेत. पंतप्रधान मोदींसह या मेळाव्याला कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह मंत्री आणि नेते उपस्थित आहेत.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या लखपती दीदी मेळाव्याच्या सुरुवातीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी महाराष्ट्रातील ५० लाख महिलांना लखपती दीदी बनवण्याचे स्वप्न पाहत आहेत असे सांगितले .
यावेळी अजित पवार म्हणाले, “3 कोटी महिलांना ‘लखपती दीदी’ बनवण्याचे स्वप्न पंतप्रधानांनी पाहिले आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील 50 लाख महिलांना ‘लखपती दीदी’ बनवण्याचा संकल्प हाती घेतला आहे. यात महाराष्ट्र कुठेही कमी पडणार नाही, याची खात्री आहे,” असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.
“महिलांवर कुठलीही जबाबदारी टाकली, तर कोणत्याही परिस्थितीत ते आव्हान यशस्वीपणे पेलू शकतात. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे,” असंही अजित पावर यांनी म्हंटले आहे.
काय आहे ‘लखपती दीदी’ योजना?
सरकारच्या या योजनेअंतर्गत देशभरातील खेड्यातील 2 कोटी महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणात महिलांना प्लंबिंग, एलईडी बल्ब बनवणे आणि ड्रोन चालवणे आणि दुरुस्ती करणे अशा अनेक कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाते. त्यानंतर स्वत:चा उद्योग उभा करण्यासाठी या महिलांना एक लाख रुपयांपासून ते 5 लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज दिले जाते. ही योजना प्रत्येक राज्यातील स्वयं-सहायता गटांमार्फत चालविली जाते. महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी सरकराने ही योजना आणली आहे.