Nana Patole : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज जळगावात ‘लखपती दीदी’ हा मेळावा होत आहे. या मेळाव्याची महायुतीकडून जोरदार तयारी करण्यात आली. पंतप्रधान या कार्यक्रमांतर्गत 11 लाख नवीन लखपती दीदींचा सन्मान करणार आहेत. पंतप्रधान मोदींसह या मेळाव्याला कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह मंत्री आणि नेते उपस्थित आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर मोदींची जळगाव येथील भेट अत्यंत महत्वाची मनाली जात आहे. मात्र, दुसरीकडे मोदींच्या या दौऱ्यावर विरोधक जोरदार टीका करत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महायुती सरकारला संवेदनहीन म्हणत हल्लाबोल केला आहे.
एकीकडे जळगावातील अनेक लोकांचा नेपाळ बस अपघातात मृत्यू झाल्याने जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. तर दुसरीकडे युतीचं सरकार तिकडे मेळाव्याच्या निमित्ताने सेलिब्रेशन करत आहे, अशी बोचरी टीका विरोधक करत आहेत.
या मेळाव्यावर पटोले म्हणाले, “काठमांडू येथे देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची बस दरीत कोसळल्याची दुर्घटना घडली. या अपघातात जळगाव येथील 27 भाविकांचा मृत्यू झाला. नुकतेच मृतांवर त्यांच्या गावात एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. असे असतानाही महायुती सरकार आणि पंतप्रधानांना थोड्या जरी भावना आणि थोडी माणुसकी असती तर त्यांनी हा कार्यक्रम रद्द केला असता. एकीकडे जनतेच्या डोळ्यात अश्रू आहेत तर दुसरीकडे हे लखपती दीदीचा उत्साह साजरा करत आहेत. आजवरच्या इतिहासात सर्वात संवेदनहीन प्रधानमंत्री या देशाने पाहिलाय.” असं म्हणत त्यांनी टीका केली आहे.