सध्या देशभरात विधानसभा निवडणुकांची जोरदार तयारी सुरू आहे. सर्वच पक्ष विधानसभा निवडणूकीसाठी तयारी करताना दिसून येत आहेत. दहा वर्षांनंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका होत आहेत. यासाठी सर्व पक्ष उमेदवारांची यादी जाहीर करत आहेत. यातच सोमवारी भाजपाने देखील जम्मू काश्मीर साठी उमेदवारांची यादी जाहीर केली होती.
परंतु अवघ्या दोन तासानंतरच भाजपाकडून यादी मागे घेण्यात आली. भाजपाने 44 उमेदवारांची यादी जाहीर केली होती यानंतर काही तासानंतर त्यांनी पुन्हा नवीन यादी जाहीर केली. यामध्ये 15 उमेदवारांना पहिल्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी तिकीट देणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकांसाठी २६ स्टार प्रचारकांची यादी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जाहीर करण्यात आली असून ती निवडणूक आयोगाकडे सादर केली आहे. पक्षाचे सरचिटणीस एस आर कोहली यांनी ही निवडणूक आयोगाकडे यादी सादर केली आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये मीडिया समन्वयासाठी भाजपने राष्ट्रीय प्रवक्ते आरपी सिंह आणि शाझिया इल्मी यांची नियुक्ती केली आहे. याव्यतिरिक्त, पंजाब राज्य मीडिया समन्वयक विनीत जोशी हे देखील जम्मू-काश्मीर निवडणुकीसाठी मीडिया समन्वय संघाचा भाग असणार आहेत.
जम्मू-काश्मीरमधील 90 जागांसाठी 18 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान 3 टप्प्यांत मतदान पार पडणार आहे. तर 4 ऑक्टोबर 2024 रोजी निकाल जाहीर होतील. जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर म्हणजेच 10 वर्षानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत.