बदलापूर येथे दोन लहान मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ मनसेने यावर्षी डोंबिबली पूर्वेतील चार रस्तावरील दहीहंडी उत्सव रद्द करत आहोत अशी घोषणा कल्याण ग्रामीणचे आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांनी केली. परिणामी यावर्षी चार रस्ता येथे मनसेची दहीहंडी उभारण्यात येणार नाही अशी माहिती समोर आली आहे.
याबाबत आमदार राजू पाटील म्हणतात, बदलापूर येथील आदर्श विद्यालयात दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार झाला. या घटनेबाबत शाळेतील आरोपी नराधामावर गुन्हा दाखल करून घेण्यात मनसेच्या बदलापूरातील पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत घटनेला वाचा फोडली. अशा घटना होवू नयेत यासाठी मनसेच्या डोंबिवलीतील पदाधिकाऱ्यांनी डोंबिवली परिसरातील शाळांमध्ये जाऊन शाळा व्यवस्थापनांना मुलींच्या सुरक्षिततेबाबत घ्यावयाची काळजी, तसेच याविषयी जनजागृती मोहीम सुरू केली आहे. त्यांनी प्रत्येक शाळेला एक छापील पत्रक देऊन मनसे पदाधिकारी त्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी शाळा व्यवस्थापनाने करावी म्हणून प्रयत्न करत आहेत.
बदलापूरातील या पीडित दोन कुटुंबांच्या घरात घडलेल्या या प्रकारामुळे ही कुटुंबे दुखी आहेत. यासाठी आपल्या पाठीशी संपूर्ण समाज आहे हे दाखविणे आवश्यक आहे. या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत मनसे त्यांना साथ देणार असेही राजू पाटील सांगतात.
वर्षोनुवर्षे डोंबिवलीत आम्ही दहीहंडी उत्सव साजरा करतच असतो पण यावर्षी बदलापूर येथील अशा निंदनीय घटनेचे सावट या उत्सवावर आहे म्हणून बदलापूर, डोंबिवली शहरात मनसेने आयोजित केलेला दहीहंडी उत्सव रद्द करण्यात येत आहे अशी माहिती राजू पाटील यांनी दिली आहे.
दरवर्षी पूर्वेकडील चार रस्ता येथील पाटणकर चौकात मनसेच्या माध्यमातून दहीहंडी उत्सव साजरा केला जातो त्यासाठी या भागातील वाहतुकीत वाहतूक विभागाने बदल केला होता पण आता दहीहंडी रद्द झाल्याने येथील वाहतूक नेहमीप्रमाणेच राहील असे दिसत आहे.