Sanjay Raut On Eknath Shinde : सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या नौदल दिनानिमित्त मालवण-राजकोट इथे आठ महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा सोमवारी 26 ऑगस्ट रोजी मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे कोसळला. समुद्र किनारी असलेला पुतळा पडल्यामुळे राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तसेच राजकीय वातावरण देखील तापल्याचे दिसत आहे.
याप्रकरणी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी महायुतीला धारेवर धरलं असून, थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा असा अपमान मुघलांनीही कधी केला नव्हता, महाराष्ट्राच्या भावनेशी खेळ करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी खासदार संजय राऊत करत आहेत.
संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
“शिवरायांच्या कोसळलेल्या पुतळ्याचं चित्र मराठी मनाला विचलीत करणारे आहे. पंतप्रधान मोदींनी पुतळ्याचं अनावरण केलं. श्रेयघेण्याची घाई, निवडणुकांचे राजकारण आणि राष्ट्रीयकामात खाऊबाजीयामुळेच हे घडले. गद्दारांचे दिल्लीश्वर पुतळ्याची प्रतिष्ठापना करतात हे शिवरायानीच झिडकारले” असं संजय राऊतांनी यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंट X वर म्हंटले आहे.
दरम्यान, आज सकाळची माध्यमांसमोर बोलताना संजय राऊत म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांचा असा अपमान मुघलांनीही कधी केला नव्हता. 1956 साली तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी प्रतापगडावर छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवला, तिथेही हवा आहे, मात्र तो पुतळा अजूनही त्याच स्थितीत मजबूत आहे. सिंधुदुर्ग किल्ल्यावर गद्दारांच्या सरकारने बांधलेला पुतळा आठ महिन्यात कोसळला. कारण तो चांगल्या मनाने नाही, तर राजकीय मनाने बांधला होता.
“तुम्ही महाराष्ट्राच्या भावनांशी खेळलात, सर्वात आधी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करतो. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना बरखास्त करायला हवं. त्यांनी शिवरायांनाही सोडलं नाही. सरकार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामातही लाखो कोटी रुपयांचा घोटाळा केला. आपापल्या लोकांना टेंडर आणि कामं दिली. ज्यांचे शिवाजी महाराज लाडके होऊ शकले नाहीत, ते लाडक्या बहिणींच्या गोष्टी करत आहेत. पण महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही. महाविकास आघाडी यावर गांभीर्याने विचार करत आहे,” अशा शब्दात संजय राऊतांनी सरकारवर निशाणा साधला आहे.