सध्या देशभरात विधानसभा निवडणुकांची तयारी जोरदार सुरू आहे. सर्वच पक्ष निवडणुकांची तयारी करताना दिसत आहेत. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्ष एकमेकांवर जोरदार टीका देखील करत आहेत. महाविकास आघाडी विधानसभा निवडणूक एकत्रित लढणार असल्याचे देखील सांगण्यात येत आहे.
अनेक पक्षांकडून जागा वाटपाच्या तयारीला सुरवात देखील झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून इच्छुक उमेदवारांना संधी देण्यात येणार अशा चर्चा रंगत आहेत कारण, 5 सप्टेंबरपर्यंत जिल्हाध्यक्षांमार्फत इच्छुकांनी अर्ज करा असे आवाहन महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून देखील हे आवाहन करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज 5 सप्टेंबरपर्यंत प्रदेश कार्यालयास सादर करावयाचे आहेत. विहीत वेळेत दाखल केलेले परिपूर्ण अर्जच पक्षाची उमेदवारी निश्चित करताना विचारात घेण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष इतर घटक पक्षांसोबत विधानसभा निवडणुकांची जोरदार तयारी करताना दिसत आहे. याबाबत अनेक बैठका देखील सुरू आहेत. मुंबईतील जागावाटपावरती सध्या चर्चा सुरू आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना ठाकरे गटात 2019 ला महाविकास आघाडीतील पक्षांनी जिंकलेल्या जागा सोडून इतर 16 जागांवर अजूनही चर्चा सुरू आहे. मुंबईतील जागा वाटपावर अजून देखील अंतिम निर्णय झालेला नाही.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करतील असे सांगितले जात आहे.