जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी भाजपने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत 40 नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. या यादीत मुख्यत्वे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह , भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांसारखे खंदे नेते जम्मू काश्मीरमधील प्रचाराची धुरा सांभाळण्यासाठी मैदानात उतरणार आहेत.
तसेच केंद्रीय मंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपशासित राज्यांच्या काही मुख्यमंत्र्यांचाही या यादीत समावेश आहे. या यादीत केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर, जी किशन रेड्डी, शिवराज सिंह चौहान आणि डॉ जितेंद्र सिंह यांचा समावेश आहे. तसेच भजनलाल शर्मा, राम माधव, तरुण चुघ, अनुराग ठाकूर, आशिष सूद, जुगल किशोर शर्मा, गुलाम अली खटाना, जयराम ठाकूर, निवृत्त जनरल व्हीके सिंह, स्मृती इराणी यांच्या नावांचाही समावेश आहे.भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत जम्मू-काश्मीरमधील नेत्यांचाही समावेश करण्यात आला आहे.
जम्मू आणि काश्मीरच्या विधानसभा निवडणुका १८ सप्टेंबर, २५ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर अशा तीन टप्प्यांत पार पडणार आहेत. तर, ४ ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये ९० जागांसाठी निवडणुका होत आहेत. याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने काल ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे .