Aaditya Thackeray : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बांधण्यात आला होता. या पुतळ्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. परंतु मंगळवारी हा पुतळा कोसळला आहे. या घटनेवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
अवघ्या आठ महिन्यातच पुतळा कोसळल्याने विरोधकांकडून यावर जोरदार टीका केली जात आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते घटनास्थळी गेले होते. अशातच आज राजकोट किल्ल्यावर भाजप विरुद्ध महाविकासआघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे येथे दाखल होताच प्रवेशद्वारावरच राडा झाल्याचा पाहायला मिळाला. ठाकरे आणि राणे समर्थकांमध्ये मोठा हा राडा झाला. यावेळी ठाकरे आणि राणे यांचे समर्थक एकमेकांना भिडले. यावेळी काही कार्यकर्त्यांना मारहाण देखील करण्यात आली.
दरम्यान, या सर्व राड्यानंतर महाविकास आघाडीची निषेध सभा पार पडली. यावेळी भर पावसात आदित्य ठाकरेंनी धडाकेबाज भाषण करत राणेंसह भाजप आणि एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल चढवला. भाषणाच्या सुरुवातीलाच ‘आज मोर्चा होता पण काही चिंधी चोर आले होते, श्रावण आहे म्हणून नाहीतर त्यांच्या खिशातून कोंबड्या पण काढल्या असत्या’, अशा शब्दात त्यांनी भाजप नेते नारायण राणे आणि त्यांच्या समर्थकांवर बोचरा वार केला आहे.
यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, “मी त्यांच्याकडे जास्त लक्ष नाही देत, ती घाण आहे. आपण कचऱ्याचं विलीनीकरण करतो त्याकडे लक्ष देत नाही. आज त्यांनी केलेला हा सर्व बालिशपणा होता त्यांच्यामुळेच तो जगासमोर आला. येथे घडलेल्या घटनेनंतर स्थानिक खासदार चार दिवसांनी आले. मात्र, आमचे वैभव नाईकांनी लगेच उस्फुर्त प्रतिक्रिया दिली होती.”
पुढे बोलताना, “जे काही घडलं भले ते काम भ्रष्टाचारी ‘भ्रष्टाचार जनता पार्टी’ने केलं असेल पण, घडलं ते चुकीचं आहे, म्हणून आपण महाराजांची माफी मागायला आलो होतो. कारण आपण महाराजांचे मावळे आहोत.” भाजपने जिथे जिथे कामे केली त्याला गळती लागली असून प्रत्येक कामात त्यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोपही आदित्य ठाकरे यांनी यावेळी केला.