Indian Army : अरुणाचल प्रदेशातील अप्पर सुबनसिरी जिल्ह्यात ट्रक खोल दरीत कोसळल्याने लष्कराच्या तीन जवानांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. बुधवारी माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, ‘ट्रान्स अरुणाचल’ महामार्गावरील तापी गावाजवळ मंगळवारी सकाळी सहा वाजता हा अपघात झाला. हवालदार नखत सिंग, नाईक मुकेश कुमार आणि ग्रेनेडियर आशिष कुमार अशी शहीद जवानांची नावे आहेत.
हवालदार नखतसिंग भाटी हे राजस्थानमधील बारमेर जिल्ह्यातील रहिवासी होते. त्यांच्या हौतात्म्याची बातमी त्यांच्या मूळ गावी हरसाणी पोहोचताच सर्वत्र शोककळा पसरली. गुरुवारी त्यांचे पार्थिव बाडमेर येथे आणण्यात येणार असून त्यानंतर हर्सानी गावात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघात झालेला लष्करी ट्रक हा लष्करी ताफ्याचा एक भाग होता, जो दापोरिजो, अप्पर सुबनसिरी या जिल्हा मुख्यालयातून लेपराडा जिल्ह्यातील बासरकडे जात होता. अपघात होताच स्थानिक लोकांनी घटनास्थळी धाव घेत जखमी आणि मृतदेह बाहेर काढण्यास मदत केली.
अरुणाचल प्रदेशात कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या शूर हवालदार नखत सिंग, नाईक मुकेश कुमार आणि ग्रेनेडियर आशिष यांच्या निधनाबद्दल लेफ्टनंट जनरल आर सी तिवारी आणि सर्व लष्करी अधिकारी यांनी शोक व्यक्त केला आहे.
#IndianArmy #EasternCommand #InTheLineofDuty#LestWeForget
Lt Gen RC Tiwari, #ArmyCdrEC & All Ranks express deepest condolences on the sad demise of Bravehearts Hav Nakhat Singh, Nk Mukesh Kumar and Gdr Ashish who made the supreme sacrifice in the line of duty in… pic.twitter.com/LcRAdHKK5h
— EasternCommand_IA (@easterncomd) August 27, 2024
दरम्यान, अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी लष्कराच्या जवानांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी लिहिले की, ‘अप्पर सुबनसिरी जिल्ह्यातील तापीजवळ झालेल्या एका भीषण अपघातात हवालदार नखत सिंग, नाईक मुकेश कुमार आणि ग्रेनेडियर आशिष कुमार या तीन लष्करी जवानांचा मृत्यू झाल्याने मला खूप दुःख झाले आहे. त्यांची देशासाठी केलेली सेवा आणि सर्वोच्च बलिदान आदराने स्मरणात राहील. शोकग्रस्त कुटुंबांप्रती माझ्या संवेदना. मी भगवान बुद्धांना शूर आत्म्यांच्या शांतीसाठी प्रार्थना करतो.”