Bharatiya Janata Party : उद्या शुक्रवारी 29 ऑगस्ट रोजी भारतीय जनता पक्षाची प्रदेश कोअर कमिटीची बैठक पार पडणार आहे. पक्षाला लागलेली गळती रोखण्यासाठी या बैठकीत चर्चा केली जाणार असल्याचे बोलले जात आहे.
ही बैठक भाजपचे केंद्रीय प्रभारी भूपेंद्र यादव, सहप्रभारी अश्विनी वैष्णव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेक नेते बाजप सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहेत, याच पार्श्ववभूमीवर ही बैठक घेण्यात येणार आहे, गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळाले नव्हते. शिवाय लोकसभेच्या निवडणुकी दरम्यान शिवसेना शिंदे गट आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक नेत्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना विधानसभेच्या उमेदवारीचा शब्द दिला होता.
मात्र, विधानसभेच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या तरीही जागावाटपा संदर्भात विचारणा होत नसल्याने अनेक नेते पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेत आहेत.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून राज्यात घडत असलेल्या दुर्घटनांमुळे महायुती सरकार आणि खासकरून राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली जात आहे. त्यामुळे भाजप काही दिवसांपासून बॅकफूटवर जात असल्याचे चित्र आहे, अशा परिस्थिती पुन्हा रुळावर येण्यासाठी काय रणनीती आखावी लागेल, यावर देखील या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती आहे.