Shashi Tharoor Case : दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी (२९ ऑगस्ट) काँग्रेस खासदार शशी थरूर यांची याचिका फेटाळली आहे, ज्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. याप्रकरणी भाजप नेत्याने त्यांच्यावर मानहानीचा दावा दाखल केला होता. याला शशी थरूर यांनी न्यायालयात आव्हान दिले होते.
थरूर यांनी ट्रायल कोर्टाचा 2019 चा आदेश रद्द करण्याची आणि 2 नोव्हेंबर 2018 ची तक्रार रद्द करण्याची मागणी केली होती ज्या अंतर्गत त्यांना आरोपी म्हणून समन्स बजावण्यात आले होते. 16 ऑक्टोबर 2020 रोजी उच्च न्यायालयाने फौजदारी कारवाईला स्थगिती देऊन अंतरिम आदेश रद्द केला होता. तसेच, पक्षकारांना 10 सप्टेंबर रोजी कनिष्ठ न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले होते. न्यायमूर्ती अनुप कुमार मेंदिरट्टा यांनी आदेश देताना सांगितले की, “कारवाई रद्द करण्याचा कोणताही आधार नाही.”
28 ऑक्टोबर 2018 रोजी बेंगळुरू येथे आयोजित लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये बोलताना शशी थरूर यांनी पीएम मोदींबद्दल आक्षेपार्ह व्यक्तव्य केले होते, “मोदी हे शिवलिंगावर बसलेल्या विंची सारखे आहेत. तुम्ही त्यांना हाताने काढू शकत नाही आणि चप्पलनेही मारू शकत नाही. जर तुम्ही ते हाताने काढले तर ते चावेल.” या विधानावरून गदारोळ झाला होता.
या विधानाविरोधात भाजप नेते राजीव बब्बर यांनी कनिष्ठ न्यायालयात खटला दाखल केला होता. त्यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे की, “मी भगवान शिवाचा भक्त आहे…थरूर यांनी कोट्यवधी शिवभक्तांच्या भावनांची अवहेलना केली, (आणि) त्यांच्या या विधानामुळे शिवभक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. ही तक्रार भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 499 (मानहानी) आणि 500 (बदनामीसाठी शिक्षा) अंतर्गत दाखल करण्यात आली.