मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे राजकारणही चांगलंच तापलं आहे. महायुतीतील दोन आमदारांमध्येच आता आरोप- प्रत्यारोप केले जात आहेत. आमदार अमोल मिटकरींनी टीका केल्यानंतर प्रत्युत्तर देतांना, अमोल मिटकरी यांचं हिंदुत्त्व तपासण्याची वेळ आली आहे असे नितेश राणे यांनी म्हंटले होते. त्यावरुन, मिटकरींनी नितेश राणे यांच्यावर पलटवार केला आहे. त्यामुळे महायुतीतील घटकपक्षाच्या दोन आमदारांमध्ये जुंपली असल्याचं पाहायला मिळत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यासह देशात याचे संतप्त पडसाद उमटताना दिसत आहेत. मालवण येथे शिवसेना ठाकरे गट आणि भाजप नेते नारायण राणे समर्थकांमध्ये जोरदार राडा झाल्याचं पाहायला मिळाले. दरम्यान, महायुतीच्या राष्ट्रवादीतील आमदार अमोल मिटकरी यांनीही फोटो ट्विट करत पुतळा दुर्घटनेवरुन सरकारला टोला लगावला. यावर आमदार नितेश राणे यांनी मिटकरींवर जोरदार निशाणा साधला आहे. अमोल मिटकरी यांचं हिंदुत्व तपासण्याची वेळ आल्याचे त्यांनी वक्तव्य केले आहे.त्यांचे धर्मांतर तर झालं नाही ना, हे त्यांना पकडून तपासण्याची वेळ आली आहे. तर अमोल मिटकरीला आम्ही आता गोल टोपी घालून मोकळा करतो, कारण तो हिंदू धर्मात राहिला नाही, असेही नितेश राणेंनी म्हणत जहरी टीका केली आहे. तर दुसरीकडे आमदार अमोल मिटकरी यांनीही नितेश राणे यांना प्रत्युत्तर दिले आहे.
आमदार अमोल मिटकरी म्हणाले, नितेश राणेंची काय लायकी आहे. हे पोलिसांना माहिती आहे. पोलिसांच्या बाबतीत अश्लील बोलणारा असा व्यक्ती जो बदलापूरच्या अत्याचाऱ्याच्या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे हा हिंदूच आहे ना, यावर राणेंनी थोबाड का उघडलं नाही. अशी टीका अमोल मिटकरी यांनी नितेश राणे यांच्यावर केली आहे. आता तो मला हिंदू धर्म शिकवतोय माझी त्या राणेंच्या पुत्राला विनंती आहे. त्याने हिंदू धर्मातील चार वेद, सहा शास्त्र आणि 18 पुराणे आहेत याची त्यांनी नावे सांगावी. आणि आपलं हिंदुत्व सिद्ध करावं असं आव्हानही मिटकरींनी केलं आहे. काँग्रेस मध्ये असताना यांनी काय विधाने केली आहेत. आम्हाला पाकिस्तानात पाठवण्याची भाषा त्यांनी करू नये. त्यांनाच आपण नेपाळ मध्ये पाठवण्याची व्यवस्था राष्ट्रवादी काँग्रेसकडून केली असल्याचा टोला मिटकरींनी नितेश राणे यांना लगावला आहे